पुरवठा विभागाची कारवाई ः गुन्हा दाखल अहमदनगर । नगर सह्याद्री रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणारा ट्रक...
पुरवठा विभागाची कारवाई ः गुन्हा दाखल
अहमदनगर । नगर सह्याद्री
रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जाणारा ट्रक पुरवठा विभागाच्या पथकाने पकडला. रविवारी पहाटे मीरी ते पांढरीपूल रोडवरील खोसपुरी (ता. नगर) शिवारात पुरवठा विभागाने ही कारवाई केली.
25 लाख रूपये किंमतीचा ट्रक, त्यामधील सहा लाख 50 हजार रूपये किंमतीचा 33 टन रेशनिंगचा तांदूळ असा 31 लाख 50 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नगर तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक शिवराज अंबादास पवार (वय 29 रा. सह्याद्री कांदबरी नगरी फेज 2, गावडे मळा, पाईपलाईन रोड, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3, 7 व प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक उद्धव पवार (रा. अंमळनेर भांड्याचे ता. पाटोदा, जि. बीड), सुनील कठाळे (रा. दहिवंडी ता. शिरूर कासार, जि. बीड), गोकुळ महादेव जाधव (रा. आर्वी, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. रेशनिंगचा 33 टन तांदूळ दुसर्या गोण्यामध्ये भरून तो काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ट्रकमधून नेला जात असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या अधिकार्यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे मीरी ते पांढरीपूल रोडवर खोसपुरी शिवारात पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे व त्यांचे अंमलदार यांनी सापळा लावला. मिळालेल्या माहितीतील संशयित ट्रक येताच पुरवठा विभाग व पोलिसांनी ट्रकला पकडले. ट्रकमध्ये तांदूळ मिळून आला. पुरवठा विभागाने तांदूळविषयी ट्रक चालकाकडे चौकशी केली असता तांदूळ रेशनिंगचा असल्याची माहिती समोर आली.
पुरवठा विभागाने 25 लाख रूपये किंमतीचा ट्रक व त्यामधील सहा लाख 50 हजार रूपये किंमतीचा 33 टन तांदूळ जप्त केला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक करीत आहेत.
COMMENTS