शिंदे गटातील खासदाराच्या मागणीवर खा. राहुल गांधी यांनी दिले जाहीर आव्हान मुंबई । वृत्तसंस्था काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी...
शिंदे गटातील खासदाराच्या मागणीवर खा. राहुल गांधी यांनी दिले जाहीर आव्हान
मुंबई । वृत्तसंस्था
काँग्रेसची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटातील नेते राहुल शेवाळे यांनी केली आहे. शेवाळे यांच्या याच मागणीवर काँग्रेसेचे खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना भारत जोडो यात्रा रोखायची असेल तर त्यांनी जरूर रोखावी. प्रत्येकाने आपापले मत मांडावे. सरकारला ही यात्रा रोखायची असेल, तर त्यांनी तो प्रयत्न करावा, असे राहुल गांधी म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
या लढाईला अगोदर समजून घ्यावे लागेल. लोकशाहीत एक पक्ष दुसर्या पक्षाशी लढत असतो. या युद्धात देशातील इतर संस्था पारदर्शकता निर्माण करतात. मात्र आता ही लढाई फक्त दोन पक्षांत नाहीये. विरोधकांचे माध्यमांवर नियंत्रण नाही. मात्र भाजपाचे माध्यमांवर नियंत्रण आहे. वेगवेगळ्या संस्थावरही भाजपाचे नियंत्रण आहे. ते न्यायव्यवस्थेवरही दबाव टाकतात. त्यामुळे काँग्रेस विरोधी पक्ष म्हणून कमी पडतोय, हे मत चुकीचे आहे. हा वरवरचा समज आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
आम्ही माध्यमांसमोर, संसदेत आमची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. फक्त काँग्रेसच नव्हे तर इतर विरोधी पक्षांनीदेखील तो प्रयत्न केला. मात्र आमच्याकडे कोणताही अन्य उपाय शिल्लक न राहिल्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला. मला देशात सध्या दोन मुख्य समस्या दिसत आहेत. पहिली समस्या म्हणजे सध्या युवकांना रोजगार मिळेल याचा विश्वास नाही. युवकांनी कोठेही शिक्षण घेतलेले असले तरी त्यांना रोजगार मिळेलच याची शाश्वती नाही. मला नोकरी मिळेल असे ठामपणे सांगणारा एकही तरुण भेटलेला नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
सावरकरांचा अपमान सहन करणार नाही ः मुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. वीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा थेट इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी राहुल गांधी यांना दिला आहे. कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे. एका आयोजित कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला गेला. पण काही लोकांनी हे सहन केलं.. असं वक्तव्य करत उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांनी हा टोमणा मारला. वीर सावरकरांचा अनेकदा अपमान झाला. त्यांना माफीवीर म्हटलं गेलं. वीर सावरकरांचा हा अपमान सहन केला जाणार नाही. कोणत्याही हिंदू विचारवंताचा अपमान महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
खा. राहुल गांधींना अटक करा ः रणजीत सावरकरांची मागणी
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणार्या काँग्रेस नेते राहुल गांधींना अटक करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे. सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी सावरकरांबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीदेखील केली आहे. तसंच सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आमच्या कुटुंबाची मागणी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सावरकरांची बदनामी केली तर आपल्याला मतं मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. पण यातून ते एका देशभक्तावर खोटे आरोप करत बदनामी करत आहेत. याआधीही त्यांनी असे उद्योग केले आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. आपण दादर पोलीस ठाण्यात तक्रार करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राहुल गांधींना अटक केली पाहिजे. कारण याच महाराष्ट्रात शरद पवारांवर ट्वीट रिट्वीट केल्याबद्दल एका अभिनेत्रीला एक महिना तुरुंगात ठेवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात सावरकरांचा असा अपमान होणार असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.
राहुल गांधी जे बोलले ते चुकीचेच ः ठाकरे
राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वीर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर निशाणा साधला. ’राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यवीरांप्रमाणे आधी वागायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
COMMENTS