अहमदनगर । नगर सह्याद्री - नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात ताराबाग कॉलनी कॉर्नरजवळील माठ विक्रीचे दोन दुकाने खाली करण्यासाठी सहा ते सात अन...
अहमदनगर । नगर सह्याद्री -
नगर-पुणे रोडवरील केडगाव उपनगरात ताराबाग कॉलनी कॉर्नरजवळील माठ विक्रीचे दोन दुकाने खाली करण्यासाठी सहा ते सात अनोळखी व्यक्तींनी चौघांना शिवीगाळ, मारहाण करत एकावर धारदार हत्याराने हल्ला करून जखमी केले. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे.
या प्रकरणी मनोज रामबाबू शहा (वय 19 रा. केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी सहा ते सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी, त्यांची आई व दोन मामा त्यांच्या नगर-पुणे रोडवरील ताराबाग कॉलनी कार्नरजवळील दुकानावर असताना त्यांना दोन मोबाईल नंबरवरून फोन आले. त्यांनी दुकाने खाली करण्यास सांगितले. यानंतर सहा ते सात जण दुकानावर आले. त्यांनी दुकाने खाली करा, असा दम देत दुकान खाली न केल्यास व त्यांना भेटण्यास न गेल्याच्या कारणावरून फिर्यादी, त्यांची आई व दोन्ही मामांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांचे मामा अमर पारस शहा यांच्या हाताच्या दंडावर धारदार हत्याराने दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
गाडी बाजुला घ्यायला सांगितल्याने चाकूहल्ला
रस्त्यावर उभी केलेली गाडी बाजुला घेण्यास सांगितल्याचा राग आल्याने तरूणावर चाकू हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री सावेडी उपनगरातील माऊली संकुलसमोर घडली. ओंकार एकनाथ लहारे (वय 30 रा. लालटाकी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
उपचारादरम्यान त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अभिजित वाकळे व एक अनोळखी व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी रात्री फिर्यादी व त्यांचा मित्र योगेश गीते माऊली संकुलकडे जात असताना रस्तावरील वाहतुकीमध्ये एक व्यक्ती थांबलेला होता. त्या व्यक्तीला फिर्यादी यांनी गाडी बाजुला घेण्यास सांगितली असता त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत मला ओळखले नाही का, मी अभी वाकळे पाटील आहे. फिर्यादी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून माऊली संकुलमध्ये गेले. पाठीमागून अभी वाकळे व त्याचा मित्र माऊली संकुलच्या बाहेर आले. त्यांनी फिर्यादीच्या डोक्यात चाकू मारून जखमी केले.
COMMENTS