तापमान 11 अंशावर । 24 तासांत थंडीची लाट अहमदनगर । नगर सह्याद्री - एकीकडे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, दुसरीकडे नगर जिल्ह्...
तापमान 11 अंशावर । 24 तासांत थंडीची लाट
अहमदनगर । नगर सह्याद्री -
एकीकडे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच, दुसरीकडे नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात हुडहुडी भरली असून काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे नगरकरांची चिंता वाढली आहे. दरम्यान नगरमध्ये कमाल तापमानाची नोंद 11 अंश सेल्सिअस झाली आहे. सर्वात कमी तापमान निफाड येथे 7.8 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
राज्यात पुढील चार दिवस थंडीचे असणार आहे. हवामानातील कोरडेपणा वाढला असून रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. यामुळे गारठा वाढणार आहे. ही स्थिती चार दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. तो अंदाज खरा ठरला आहे. दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात हुडहुडी भरली आहे. नगर जिल्ह्यातही तीच स्थिती आहे. काल कमाल तापमानाची नोंद 11 अंश सेल्सिअस नोंदवली गेली आहे. थंडीचा पारा खाली आल्याने रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटविल्याचे चित्र दिसत आहे. सकाळी कान टोपी व स्वेटर असे उबदार कपडे घालून नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत.
या वाढत्या थंडीचा गहू, हरबरा व अन्य पिकांना लाभ होणार असलातरी द्राक्ष उत्पादक चितेत सापडली आहे. नाशिकमध्ये 9.8, पुणे 9.7, धुळे 7.1, निफाड 7.8, जळगाव 8.5 सेल्सिअस अंश नोंदले गेले.
COMMENTS