अहमदनगर । नगर सह्याद्री - पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीची जामीनावर सुटका झाल्यानंतर तो संबंधित पीडितेस त्रास देत असल्याने ...
अहमदनगर । नगर सह्याद्री -
पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या आरोपीची जामीनावर सुटका झाल्यानंतर तो संबंधित पीडितेस त्रास देत असल्याने पोक्सो न्यायालयाच्या विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांनी आरोपीला पूर्वीच्या न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करून ताब्यात घेण्याचे आदेश देत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड. मनीषा पी. केळगंद्रे-शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे विशेष भूमिका बजावली.
नगरच्या कोतवाली पोलिसस्टेशन अंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपीचे नाव माऊली उर्फ ज्ञानदेव बापू धायगुडे (रा. राक्षसवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे आहे. कोतवाली पोलिसस्टेशनमध्ये भा.दं.वि. कलम 376 अंतर्गत दाखल गुन्हयातील पिडीत हिने सरकारी वकिलांमार्फत न्यायालयाकडे लेखी स्वरूपात अर्ज देवून सांगितले की, संबंधित गुन्ह्यातील आरोपी माऊली उर्फ ज्ञानदेव बापू धायगुडे हा पीडितेच्या घराजवळ राहायला आहे.
आरोपी सातत्याने संबंधित गुन्ह्यात जामीन मंजूर झाल्यापासून पिडीतेच्या मोबाईलवर वाईट व अश्लील भाषेत मेसेज करीत आहे. तसेच आरोपी हा पिडीतेस पहाटेच्या सुमारास भेटायला बोलवित होता. तसेच आरोपी पिडीतेस तिची समाजामध्ये बदनामी करीन, अशी धमकी देत होता. आरोपीच्या अशा वागण्यामुळे पिडीतेच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होत होता. याबाबत पिडीतेने न्यायालयात लेखी अर्जासोबत व्हॉटसअॅप मेसेजच्या स्क्रीन शॉटच्या कॉपीज जोडल्या होत्या.
पिडीतेचा सरकारी वकिलांमार्फत अर्ज न्यायालयात दाखल झाल्यानंतर आरोपीच्या वकीलांचे त्यावर म्हणणे मागविले. त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी पिडीतेचा अर्ज खोटा तसेच संबंधित केसची सुनावणी लांबविण्यासाठी अर्ज दिल्याचे म्हणणे लेखी स्वरूपात दाखल करून पिडीतेचा अर्ज नामंजूर करण्याची मागणी केली. मात्र, सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी युक्तीवाद केला की, पिडीत हिने अर्जासोबत दाखल केलेले मेसेज जर वाचून पाहिले तर आरोपीने पिडीतेस अतिशय गलिच्छ, अर्वाच्च व अश्लिल भाषेत मेसेजेस केलेले दिसत आहेत. त्याबरोबर आरोपी रात्री-मध्यरात्री पिडीतेस व्हिडीओ कॉलकरीत असल्याचे दिसत आहे.
मेसेजवरून आरोपी पिडीतेस धमक्या देत असल्याचेही दिसत आहे. त्याचबरोबर काही मेसेज पाहिले तर आरोपीने त्याच्या स्वतःच्या वकिलांविरुद्ध अतिशय घाणेरडया भाषेत पिडीतेस मेसेज केल्याचे दिसून येत आहे. पूर्वीच्या न्यायालयाने आरोपीस जामीन देतेवेळी काही अटी घालून दिल्या होत्या, पण त्या अटींचे पालन आरोपीने केले नाही. तसेच आरोपीस त्याच्याविरुद्ध न्यायालयात गंभीर गुन्हा दाखल असल्याबाबतची केस चालू आहे, याबाबतचेही भान नाही व अशा आरोपीस जामिनावर तसेच खुले ठेवल्यास आरोपीचे मनोधैर्य वाढून तो पिडीतेस त्रास देत राहील. त्यामुळे पिडीतेचे जीवन जगणे मुश्किल होईल. याचा परिणाम तिच्या वैवाहिक जीवनावर होईल, असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील अॅड. केळगंद्रे यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य ठरवून आरोपीला ताब्यात घेण्याचे आदेश देत त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश
या प्रकरणात सरकारी वकील अॅड. मनीषा केळगंद्रे यांचा युक्तीवाद व घटनेचे गांभीर्य पाहून न्यायालयाने आरोपी माऊली उर्फ ज्ञानदेव बापू धायगुडे यास पूर्वीच्या न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करून ताब्यात घेतले. या आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तसेच आरोपीचा वापरता मोबाईल जप्त करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आदेश कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना दिलेे आहेत.
COMMENTS