’भारत जोडो यात्रे’साठी काँग्रेस कार्यकर्ते रवाना अहमदनगर । नगर सह्याद्री राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात ...
’भारत जोडो यात्रे’साठी काँग्रेस कार्यकर्ते रवाना
अहमदनगर । नगर सह्याद्री
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी नगर शहराच्या ऐतिहासिक मातीचा कलश घेऊन काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने गुरुवारी सकाळी बसेस, खाजगी वाहनातून अकोले तालुक्यातील बाळापुरकडे भारत जोडोचा जयघोष करत रवाना झाले. खड्डे आणि रस्ते या विषयावरून नगर पासून मुंबई पर्यंत मोर्चा, आंदोलने, उपोषण करत रान पेटवणार्या काँग्रेसने मात्र जाताना उड्डाणपूल उद्घाटनासाठी नगर शहरात येणार्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींना ’नगर शहर खड्डे दर्शन यात्रेचे’ जाहीर निमंत्रण दिले आहे.
चितळे रोडवरील किरण काळे यांच्या शिवनेरी कार्यालयापासून शहरातले कार्यकर्ते गुरूवारी सकाळीच यात्रेसाठी रवाना झाले. संध्याकाळी ते अकोल्याच्या बाळापूर या ठिकाणी पोहोचणार असून तेथेच मुक्काम करणार आहेत. शुक्रवारी सकाळी सहा वाजता कुपटा (जि. अकोला) येथून राहुल गांधींच्या पदयात्रेत शहरातील कार्यकर्ते सहभागी होणार असून दुपारी साडेचार वाजता शेगावच्या भव्य जाहीर सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती किरण काळे यांनी दिली आहे. सभेनंतर शेगावात मुक्काम करून शनिवारी सकाळी सहा वाजता राहुल गांधीं समवेत पुन्हा यात्रेत कार्यकर्ते पायी चालणार असून सायंकाळी जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळपर्यंत यात्रेत सहभागी होणार आहेत. रविवारी शहरातील कार्यकर्ते परत नगर शहरात दाखल होणार आहेत. नगर तालुक्यातून काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के, उपाध्यक्ष भरत बोडके, सरचिटणीस शशिकांत गावडे, पापामिया पटेल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेसाठी रवाना झाले आहेत.
भारत जोडो यात्रेसाठी रवाना झालेल्या काँग्रेसने, नगरकरांच्या याताना समजून घेण्यासाठी गडकरी यांनी दुचाकीवरून शहराची यात्रा करावी असे जाहीर आवाहन काळे यांनी नगरकरांच्या वतीने केले आहे. उड्डाण पुलासाठी केंद्र सरकारने सुमारे 260 कोटी रुपये खर्च केले आहेत. एका उड्डाणपूलासाठी केलेल्या या खर्चा एवढीच रुपये 260 कोटींची रक्कम विशेष पॅकेज म्हणून नगर शहरातील अंतर्गत रस्ते पुढील 70 वर्षे टिकतील यासाठी केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावेत, अशी जाहीर मागणी नगर दौर्यावर येणार्या गडकरींकडे काळेंनी नगरकरांसाठी केली आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री या नात्याने दौरा मार्गावरील रस्ते चकाचक करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरू झाले आहे. शहरातील ज्या रस्त्यांवरून मंत्री जाणार आहेत त्या रस्त्यांचे भाग्य उजळले आहे. मात्र बुर्हाणनगर ते प्रोफेसर कॉलनी ते शिल्पा गार्डन ते पोलीस परेड ग्राउंड म्हणजे नगर शहर नाही. याव्यतिरिक्त खड्ड्यात हरवलेल्या शहराच्या अन्य मार्गांनी देखील देशाच्या रस्ते मंत्र्यांनी शहराची यात्रा करावी. म्हणजे शहराच्या सर्वच रस्त्यांचे आणि खड्ड्यांचेही भाग्य उजळेल, असे म्हणत काँग्रेसने गडकरी यांना शहर खड्डे दर्शन यात्रेसाठी यात्रा मार्ग सुचविला आहे.
COMMENTS