इम्रान खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने २४ तासांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
इम्रान खान यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने २४ तासांत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने पंजाब प्रांताच्या पोलिस महानिरीक्षकांना आतापर्यंत एफआयआर न नोंदवण्याचे कारण विचारले आहे. जर २४ तासांत एफआयआर नोंदवला गेला नाही तर न्यायालय या प्रकरणाची स्वतःहून दखल घेईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
याशिवाय न्यायालयाने पंजाब पोलिसांना कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पंजाब पोलिसांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर एफआयआर नोंदवत नसल्याचा आरोप केला होता. तक्रारीतून लष्कराच्या जनरलचे नाव काढून टाकेपर्यंत अधिकारी गुन्हा नोंदवण्यास नकार देत असल्याचे त्यांनी म्हटले होते.
त्याचबरोबर इम्रान खान यांच्या हत्येच्या प्रयत्नाची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना केली जाऊ शकते. याची शिफारस खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे. त्यांनी पाकिस्तानचे सरन्यायाधीश उमर अता बंदियाल यांच्याकडे पूर्ण न्यायालय आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी इम्रान खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ, गृहमंत्री राणा सनाउल्ला आणि मेजर जनरल फैसल नसीर यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर शेहबाज शरीफ यांनी आपल्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी सरन्यायाधीशांसह वरिष्ठ न्यायाधीशांचा समावेश असलेला पूर्ण न्यायालय आयोग स्थापन करण्याची शिफारस केली आहे. शनिवारी पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी यासंदर्भात अधिकृत पत्रही लिहिणार असल्याचे सांगितले होते.
सुप्रीम कोर्ट या प्रकरणी अधिकृत पत्राची वाट पाहत असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर सरन्यायाधीश इतर न्यायाधीशांशीही या विषयावर चर्चा करू शकतात. मात्र, पंतप्रधान सरन्यायाधीशांकडे आयोगाच्या स्थापनेची मागणी करू शकत नाहीत, असेही बोलले जात आहे. न्यायालयीन आयोगाचे अधिकार सरन्यायाधीशांकडे असतात.
यापूर्वी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हल्ला झाला होता. इम्रान खान हाकीकी आझादी मोर्चा काढत असताना हा हल्ला झाला. यादरम्यान दोन बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. मात्र, इम्रान खान या हल्ल्यातून बचावले आणि गोळी त्यांच्या पायाला लागली. काही वेळातच एका हल्लेखोराला जमावाने पकडले. तर इम्रान खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेचच इम्रान खान यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला.
COMMENTS