घरेलू कामगारांना 10 हजार रुपयांचा लाभ देण्याची कामगार मंत्रीची घोषणा शासनस्तरावर पाठपुरावा केल्याबद्दल सहाय्यक कामगार...
घरेलू कामगारांना 10 हजार रुपयांचा लाभ देण्याची कामगार मंत्रीची घोषणा
शासनस्तरावर पाठपुरावा केल्याबद्दल सहाय्यक कामगार आयुक्त कौले यांचा सत्कार
अहमदनगर / नगर सह्याद्री
राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणार्या आणि 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणी करून घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळण्याची घोषणा कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केल्याबद्दल क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या घरेलू कामगार महिलांनी या निर्णयाचे स्वागत केले. तर संघटनेच्या या मागणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा केल्याबद्दल नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कौले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, घरेलू कामगार आशा शिंदे, प्रमिला रोकडे, उषा बोरुडे, सावित्रा धाडगे, कमल वाकचौरे, प्रेमा चव्हाण, कविता अनवने, जना आव्हाड आदी उपस्थित होते.
मुंबई येथील एका कार्यक्रमात कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी घरेलू कामगारांना हा लाभ देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून घरेलू मोलकरीणांनी नवरात्रीमध्ये नवदुर्गा जागर आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश आले असल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्षा कोंडा यांनी दिली.
शासनाच्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाची स्थापना झालेली आहे. या मंडळामार्फत नोंदणीकृत घरेलू कामगार आर्थिक लाभ देण्यात येतो. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत आणि 55 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या घरेलू कामगारांना दहा हजार रुपयांच्या आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. घरेलू कामगारांना कल्याण महामंडळाकडून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याने घरेलू मोलकरीण कामगारांनी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये नवदुर्गा जागर आंदोलन केले होते. दोन दिवस सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या वरिष्ठस्तरावर पाठविण्याचे आश्वासन सहाय्यक कामगार आयुक्त कौले यांनी दिले होते. या मागण्यांची दखल घेऊन महत्त्वाचा व कल्याणकारी निर्णय घेण्यात आला असल्याचे क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
घरेलू मोलकरीण कामगारांची कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट बनली होती. टाळेबंदीत त्यांनी उसनवारी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यांना मिळालेल्या अनुदानामुळे मोठा आर्थिक हातभार लागणार आहे. -अनिता कोंडा
राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत राज्यात घरेलू कामगार म्हणून काम करणार्या आणि 55 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणी करून घरेलू कामगारांना सन्मान धन योजनेअंतर्गत 10 हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळण्याची घोषणा कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केल्याबद्दल क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन या मागणीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणारे नगरचे सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कौले यांचा सत्कार करताना संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा, घरेलू कामगार आशा शिंदे, प्रमिला रोकडे, उषा बोरुडे, सावित्रा धाडगे, कमल वाकचौरे, प्रेमा चव्हाण, कविता अनवने, जना आव्हाड आदी.
.
COMMENTS