पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश ः अपघात टाळण्यासाठी खबरदारी अहमदनगर | नगर सह्याद्री हॉटेल अशोका चौक ते सक्कर चौक दरम्यान उभारलेला उड्डा...
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेश ः अपघात टाळण्यासाठी खबरदारी
अहमदनगर | नगर सह्याद्री
हॉटेल अशोका चौक ते सक्कर चौक दरम्यान उभारलेला उड्डाणपुल वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून पुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले त्यांच्या हातगाड्या उभ्या करून किंवा सदर उड्डाणपुलावरून हातगाडीसह प्रवास करून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहे. शुक्रवार दि. २५ नोव्हेंबरपासून उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी फेरीवाले, ठेलेवाले व जनावरे नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
१९ नोव्हेंबरला उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले असून उड्डाणपुल सार्वजनिक वाहतुकीकरीता खुला करण्यात आला आहे. परंतु उड्डाणपुल हा नगर शहरातील पहिलाच असल्यामुळे वाहनांसह इतरही गर्दी त्यावर होऊ लागली. उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले त्यांच्या हातगाड्या उभ्या करून व्यावसाय करत असून यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच काही इसम जनावरे घेऊन जात असून, काही उत्साही पादचारी उड्डाणपुलावर थांबुन सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊन कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शयता आहे. या बाबींचा विचार करून उड्डाणपुलावर पादचारी, हातगाडी, फेरीवाले, ठेलेवाले, व जनावरे यांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
COMMENTS