ठरावाविरोधात उचित कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी अहमदनगर । नगर सह्याद्री सावेडी स्मशानभूमीसाठी 32 कोटी खर्चून जागा खरेदी करण्याचा मह...
ठरावाविरोधात उचित कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी
अहमदनगर । नगर सह्याद्री
सावेडी स्मशानभूमीसाठी 32 कोटी खर्चून जागा खरेदी करण्याचा महापालिकेने केलेला ठराव रद्द करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नगरसेवक संग्राम शेळके यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या संदर्भात निवेदन पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे, की गेल्या अनेक वर्षांपासून सावेडी उपनगरामध्ये स्वतंत्र स्मशानभूमी व्हावी यासाठी नागरिक, नगरसेवक, पदाधिकारी मागणी करत आहेत. सावेडी उपनगरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता तेथे स्मशानभूमी होणे अत्यंत गरजेचे आहे. बोल्हेगाव, सावेडी उपनगरातील स्मशानभूमी, दफनभूमीसाठी महापालिकेच्या महासभेमध्ये सर्वे नंबर 261/अ/1 ही जागा 32 कोटी रुपये खर्चून खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे.
सावेडी उपनगरातील नगरसेवक, नागरिकांच्या मागणीनुसार स्वतंत्र स्मशानभूमीसाठी यापूर्वीच जागा आरक्षित करण्यात आली. मात्र महापालिका प्रशासनाला आजपर्यंत ती संपादित करता आली नाही. संबंधित जागा मालकाने जागा देण्यास विरोध केला. त्या कारणाने महापालिकेने सावेडीतील स्मशानभूमीसाठी अन्य जागेचा शोध घेतला. सावेडी उपनगरात स्मशानभूमी व दफनभूमीसाठी अडीच हेक्टर जागा खरेदीसाठी तब्बल 32 कोटींचा खर्च येणार असून तो बोजा महापालिकेवर पडणार आहे. या प्रस्तावास विरोध असतांनाही महासभेत स्मशानभूमीसाठी जागा खरेदी करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली. सावेडी उपनगरात स्मशानभूमी करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु, यापूर्वी आरक्षित केलेल्या जागेवर
महापालिकेने स्मशानभूमी, दफनभूमी केल्यास महापालिकेवर बोजा पडणार नाही. स्मशानभूमीकरिता वापरण्यात येणारी रक्कम नगर शहरातील खड्डे बुजविण्याकरिता, उद्यान विकसित करण्याकरिता, चौक सुशोभिकरण यांसह नगर शहराच्या विकासात भर पडेल यासाठी वापरावी. या संदर्भात उचित कार्यवाही करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.
COMMENTS