अहमदनगर | नगर सह्याद्री मार्केट यार्डमधील हमाल पंचायतसमोर रेशनच्या तांदळाच्या अवैध साठा एका पिकअपमधून जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा ...
अहमदनगर | नगर सह्याद्री
मार्केट यार्डमधील हमाल पंचायतसमोर रेशनच्या तांदळाच्या अवैध साठा एका पिकअपमधून जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी संयुक्तपणे ही कारवाई केली. यात सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मार्केटयार्ड हमाल पंचायत समोरील बोथरा यांच्या गाळ्याजवळ एक पीकअप गाडी शासकीय योजनेतील रेशनचा तांदूळ घेऊन आल्याची माहिती मिळाली. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह संयुक्त कारवाई करत सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
यावेळी मार्केटयार्ड येथे दीपक ताराचंद बोथरा (रा. माणिकनगर, बुरुडगाव रोड) यांच्या गाळ्यासमोर एका पिकअपमधून (एमएच २८ एबी ०४४९) काही कामगार गोणीमधील पांढरा तांदूळ खाली करताना आढळून आले. तसेच या गाळ्यात काही रेशनच्या तांदळाची साठवणूक केल्याचे आढळून आले. पोलिसांनी पिकअप व रेशनचा तांदूळ असा २ लाख ९९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सना चांद बेग (रा. भाळवणी, ता पारनेर) व दीपक ताराचंद बोथरा (वय ५५, रा. माणिकनगर) यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू कायदा कलम १९५५ च्या कलम ३ व ७, भादवि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमलदार सुजय हिवाळे यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, पोलिस निरीक्षक अनिल कटके, गुन्हे शोध पथकाचे पोसई मनोज कचरे, पोहेकाँ गणेश थोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना रियाज इनामदार, पोना योगेश खामकर, पोकॉ अमोल गाढे, सुजय हिवाळे, संदीप थोरात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई सोपान गोरे, पोहेकाँ संदीप पवार, पोकॉ रविकरण सोनटक्के, जालींदर माने, योगेश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
COMMENTS