अहमदनगर । नगर सह्याद्री अहमदनगर महापालिकेच्या कर्मचार्यास मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्या प्रकरणी एका पॅगो रिक्षा चालकासह माजी नगरसेवक ...
अहमदनगर । नगर सह्याद्री
अहमदनगर महापालिकेच्या कर्मचार्यास मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्या प्रकरणी एका पॅगो रिक्षा चालकासह माजी नगरसेवक शेख मुददसर इसाक अहमद व इतर तीन अनोळखी इसमानवर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कोठला स्टॅन्ड परिसरात मनपाचे स्वच्छता निरिक्षक राजेश प्रकाश तावरे त्यांचे शासकीय कामकाज करत असताना तीनचाकी माल वाहतूक रिक्षा (एमएच 16 एई 5268) मधून दोन व्यक्तींना 10 ते 12 गोण्या अॅनिमल वेस्टेज टाकताना पाहिले. त्यांना तावरे यांनी येथे अॅनिमल वेस्टेज टाकू नका, असे सांगितले. त्या दोन व्यक्तींनी माजी नगरसेवक मुदस्सर यांना बोलावून घेतले. अॅनिमल वेस्टेज टाकणार्या व्यक्तींना पाच हजार रुपयांची पावती फाडावी लागेल, असे सांगितले असता आरोपी यांनी राजेश तावरे यांच्याबरोबर शाब्दिक बाचाबाची केली. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली.
घडलेला प्रकार वरिष्ठ अधिकारी उपायुक्त यशवंत डांगे, घनकचरा व्यवस्थापक डॉ. शंकर शेडाळे यांना सांगितला. तसेच आरोपींनी केलेल्या धक्काबुक्कीमध्ये विशाल अशोक खंडागळे, गणेश पांडुरंग घोरपडे यांना मुकामार लागला आहे. या प्रकरणी राजेश तावरे यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून माजी नगरसेवक शेख मुद्दसर इसाक अहमद (रा. मुकुंदनगर), पॅगो रिक्षा चालक व तीन अनोळखी व्यक्तींवर भादविक 353, 143, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भिंगार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख करत आहेत.
COMMENTS