अहमदनगर । नगर सह्याद्री थोडेथोडके नव्हे तर चक्क 32 कोटी रूपये खर्चून सावेडी स्मशानभूमीसाठी जागा खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताध...
अहमदनगर । नगर सह्याद्री
थोडेथोडके नव्हे तर चक्क 32 कोटी रूपये खर्चून सावेडी स्मशानभूमीसाठी जागा खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेतील सत्ताधार्यांनी बहुमताच्या जोरावर घेतला. अगोदर विरोध नोंदविणारे काही नगरसेवक जाणीवपूर्वक सभेत हा विषय आल्यानंतर गायब झाले होते. त्यामुळे याची चर्चा दिवसभर शहरात होती. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अनिल शिंदे आणि ठाकरे गटाचे नगरसेवक मदन आढाव, काँग्रेसच्या शिला चव्हाण यांनी या विषयाला अखेरपर्यंत विरोध दर्शविला. शिंदे यांनी तर या प्रकरणात चौकशी लावण्यात येईल, असा इशाराही दिला.
सावेडीत स्मशानभूमी असावी, अशी अनेक वर्षांची रास्त मागणी आहे. सावेडीत कचरा डेपोची जागा सध्या रिकामी आहे. या जागेवरील कचरा डेपो हलविण्यात आला आहे. तसेच कोविड काळात येथे काही अंत्यविधी झालेले आहेत. ही जागा महापालिकेच्या ताब्यात असल्याने 32 कोटी खर्चून नवीन जागा घेण्यापेक्षा याच जागेवर स्मशानभूमी करावी, अशी अनिल शिंदे, मदन आढाव यांचे मत होते. काही नगरसेवकांनी विरोध दर्शविल्याने त्यांची ‘समजूत’ काढण्याचाही प्रयत्न झाला. मात्र त्यात पूर्ण यश आले नाही. त्यामुळे काही वेळ हा विषय लांबणीवर टाकला. सभागृहात ज्यावेळी अवघे काही नगरसेवक उरले आणि ते या विषयावर चुप्पी साधणारे आहेत, याची खात्री झाल्यानंतर हा विषय तातडीने मंजूर करण्यात आला. सभेत हा विषय मंजूर केला गेला असला तरी त्याची अंमलबजावणी एवढी सोपी नाही, असे एकूण दिसत आहे. विशेष म्हणजे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी या संपूर्ण विषयावर साधलेली चुप्पी आश्चर्यकारक मानली जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक असलेले नगरसेवक अनिल शिंदे यांनी या विषयावर दोन हात करण्याची तयारी दर्शविली आहे. एकूणच या सर्व विषयात मोठा गैरव्यवहाराची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह गृहविभागाकडेही याबाबत तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांचा विरोध किती दिवस टिकतो, त्यावर या विषयाचे पुढील भवितव्य राहणार आहे. नगररचनाचे प्रमुख राम चारठाणकर यांच्या भूमिकेवरही नगरसेवकांनी संशय व्यक्त केला. नगररचनाचे अधिकारी आणि काही पदाधिकारी यांच्यासाठी हा विषय मंजूर करण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला.
आरक्षण नसताना
सावेडी स्मशानभूमीसाठी 32 कोटी देऊन जी जागा खरेदी करण्याचा ठराव करण्यात आला, त्या जागेवर स्मशानभूमीचे आरक्षण नाही. हे आरक्षण टाकण्यात येईल, त्यापूर्वी निर्णय घेतला तरी चालेल, असे नगररचनाकार राम चारठाणकर यांनी सांगितले. दुसरीकडे कचरा डेपो असलेल्या जागेवर स्मशानभूमीचे आरक्षण नाही, असेही कारण देण्यात येत होते. नव्याने खरेदी करावयाच्या जागेवर आरक्षण टाकून घेता येत असेल तर कचरा डेपोच्या जागेवर का नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादीचा असाही विरोध...
सावेडीतील स्मशानभूमीसाठी 32 कोटी रूपये खर्च करण्याच्या विषयाला राष्ट्रवादीचे असलेले विरोधी पक्षनेते संपत बारस्कर विरोध करत होते. मात्र त्याचवेळी डायसवर असलेले राष्ट्रवादीचेच उपमहापौर गणेश भोसले या विषयाचे समर्थन करत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेबाबतही आश्चर्य व्यक्त होत होते.
COMMENTS