बुरुडगाव रोडला सुरू झाले काम । शहरात दुसरा मोठा प्रकल्प होणार अहमदनगर । नगर सह्याद्री - जुन्या-नव्या हिंदी-मराठीगाण्यांच्या तालावर व रंगी...
बुरुडगाव रोडला सुरू झाले काम । शहरात दुसरा मोठा प्रकल्प होणार
अहमदनगर । नगर सह्याद्री -
जुन्या-नव्या हिंदी-मराठीगाण्यांच्या तालावर व रंगीबिरंगी प्रकाश झोतात नाचणारे पाणी नगरकरांना आता दिसणार आहे. उड्डाणपुलानंतरचा दुसरा एक कोटी रुपये खर्चून होणारा प्रकल्प म्युझिकल फाऊंटनचा असणार आहे. बुरुडगाव रोडवर डॉक्टर कॉलनीच्या पुढे असलेल्या साईनगर परिसरात या फाऊंटनचे (पाण्याचे कारंजे) काम सुरू झाले आहे. येत्या चार महिन्यात ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नव्या वर्षात नवा आकर्षक प्रकल्प नगरकरांना मिळणार आहे.
नगर शहराच्या बहुतांश सर्वच भागातील रस्ते पायी चालण्यायोग्य राहिले नसले तरी या खड्डेयुक्त रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हळूहळू मनपा हाती घेण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी दुसरीकडे महापालिकेने एक कोेटी 6 लाख रुपये खर्चाची म्युझिकल गार्डन नगरकरांना देऊ केली आहे. महापालिका हद्दीतील प्रभाग 14 मधील म्हणजे उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रभागातील बुरुडगाव रोडवरील मोकळ्या जागेतील साईनगर उद्यानात हे म्युझिकल गार्डन महापालिका उभारणार आहे. या संदर्भातील निविदा दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत अंतिम झाली आहे.
आता प्रत्यक्षात या म्युझिकल फाऊंटन उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे.आ. संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक नियोजन समितीत्या 2021-22 च्या नाविन्यपूर्ण योजनेतून 1 कोटी 6 लाख 9 हजार 614 रुपये खर्चून साईनगर उद्यानात म्युझिकल गार्डन होणार आहे. या म्युझिकल गार्डनमध्ये संगीताच्या तालावर नाचणारे पाण्याचे कारंजे असणार आहे. ते उभारण्याचे काम येथील ठेकेदार रोहित अंधारे यांनी घेतले आहे. या शिवाय प्रत्यक्ष कारंजे उभारणीच्या कामासाठी त्यांना औरंगाबाद येथील पटेल नावाचा कारागीर मदत करणार आहे. या कारंजाचे काम सुरू करण्यासाठी 50 फुटी व्यास असलेला खड्डा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या चार महिन्यात कारंजाचे काम करून तो नगरकरांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.
असे असेल म्युझिकल फाऊंटन
* 50 फुटी व्यासाच्या सुमारे 10 ते 15 फूटखोल खड्ड्यात सिमेंट काँक्रिटीकरण करून सुमारे 40 हजार लिटर पाणी टाकले जाणार आहे. त्यात जमिनीपासून सुमारे 3 फूट उंचीवर म्युझिकल फाऊंटन असणार आहे. * या फाऊंटनच्या पाईपलाईनला 20-22 नोझल असून यातील 3 नोझल 20 फूट उंच पाणी फेकणारे व अन्य 10 ते 15 फूट उंचपाणी फेकणारे असतील. यातील काही नोझल 90 डिग्रीमध्ये फिरणारे आहेत. प्रत्येक नोझलला स्वतंत्र मोटार असेल व ती संगणकाद्वारे नियंत्रित केली जाणार आहे. यात गाण्यांसाठी स्पीकर सिस्टीमही असेल. तीही संगणकाद्वारेच नियंत्रित होणार आहे. यासाठी येथे स्वतंत्र कंट्रोल रुम असणार आहे.
* संगीत-गाण्यांच्या तालावर खाली-वर उडणार्या पाण्याच्या तुषारांवर आकर्षक विद्यूत झोत टाकला जाणार आहे.
COMMENTS