मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल अहमदनगर । नगर सह्याद्री - 12 ते 13 जणांनी येथील चाँद सुलताना हायस्कूल व ज्...
मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचा ताबा घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल
अहमदनगर । नगर सह्याद्री -
12 ते 13 जणांनी येथील चाँद सुलताना हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये जबरदस्तीने प्रवेश करून मुख्याध्यापक कार्यालयाचा ताबा घेतला. शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी शिक्षक जफर हसनमियाँ सय्यद (वय 51 रा. झेंडीगेट) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सय्यद अब्दुलमतीन अब्दुल रहीम, सय्यद वहाब, मौलाना शफीक रशीद कासमी, शेख गुलाम दस्तगीर, शेख अकील लियाकत, शेख समी इमाम, शेख तन्वीर चाँद, शेख समद वहाब, शेख नवेद रशीद, शेख मुशाहिद लियाकत (पत्ता माहिती नाही) व इतर दोन अनोळखी यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी दुपारी चाँद सुलताना हायस्कूलमध्ये मुख्याधापक कार्यालयात मुख्याध्यापिका गुलनाज युसूफ इनामदार, उपमुख्याध्यापक इलियास गणी तांबोळी व फिर्यादी यांच्यामध्ये नगर शहरातील स्थलांतरीत मुले सर्वेक्षण नियोजनाची बैठक सुरू होती. त्यावेळी वरील 12 ते 13 जणांनी जबरदस्तीने मुख्याध्यापक कार्यालयात घुसून खुर्च्यांचा ताबा घेतला. मुख्याध्यापिकांना तुम्हाला आजपासून बडतर्फ केले आहे, तुम्ही आत्तापासून येथे बसू नका, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी दिली. बळजबरीने अनधिकृत व्यक्तींना हाताशी धरून मुख्याध्यापक कार्यालयाचा ताबा घेतला.हा सर्व प्रकार सुरू असताना फिर्यादी व उपमुख्याध्यापक इलियास गणी तांबोळी यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांना धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर उपमुख्याध्यापकांकडून कार्यालयाच्या चाव्या हिसकावून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कामगार महिलेचा विनयभंग; शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल
हायस्कूलमधील शिक्षकाने कामगार महिलेला शिवीगाळ करत विनयभंग केल्याची घटना सोमवारी दुपारी शहरातील एका हायस्कूलमध्ये घडली. पीडित कामगार महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.सय्यद जफर हसनमिया (रा. झेंडीगेट) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. सोमवारी दुपारी हायस्कूलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी लोक आले होते. फिर्यादी त्यांना हायस्कूलमध्ये सीसीटीव्ही कुठे बसवायचे ते दाखवित होत्या. तेवढ्यात तेथे शिक्षक सय्यद जफर हसनमिया आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून गेला. उजवा हात धरून मारहाण केली व जोरात खाली ढकलून दिले. फिर्यादी उठून उभ्या राहिल्यानंतर सय्यद जफर हसनमिया याने फिर्यादीच्या खांद्यावर हात ठेऊन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. फिर्यादी यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून सय्यद जफर हसनमिया याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
COMMENTS