51 लाख रुपयांची भरपाई देण्याचा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश पारनेर। नगर सह्याद्री मुंबई खंडपीठात वकिली करणारे उत्तम रंगनाथ आं...
51 लाख रुपयांची भरपाई देण्याचा राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा आदेश
पारनेर। नगर सह्याद्री
मुंबई खंडपीठात वकिली करणारे उत्तम रंगनाथ आंधळे (मुळ रा. कर्जुले हर्या) यांना नवी मुंबईतील एका भोंदू डॉक्टरने उपचार करताना चुकीचे इंजेक्शन दिले. चुकीचे इंजेक्शन आणि चुकीचे औषधे यामुळे त्यांचा मृत्यू झाला. सदर घटना 2014 मध्ये घडली. यानंतर याविरोधात तक्रार निवारण आयोगाकडे दाद मागण्यात आली. सदरच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आणि आयोगाने डॉ. दत्तात्रय आवाडे यांना पीडित कुटुंबाला 51 लाख 37 हजार भरपाई आणि घटना घडल्यापासून प्रत्यक्ष पैसे देईपर्यंत 12 टक्के व्याज देण्याचे आदेश आयोगाचे अध्यक्ष न्या. एस. पी. तावडे व न्यायीक सदस्य ए. झेड. ख्वाजा यांच्या खंडपीठाने दिले.
आठ वर्षांपूर्वी उत्तम रंगनाथ आंधळे यांचा डावा खांदा दुखू लागल्याने ते नेरुळ (नवी मुंबई) येथील डॉ.आगाडे यांच्या संजीवनी क्लीनीक येथे उपचारासाठी गेले. डॉक्टरांनी त्यांच्या कंबरेत डाव्या बाजूला डायक्लोफनॅक हे वेदनाशामक इंजेक्शन दिले व काही औषधेही दिली. यानंतर ते घरी गेले असता इंजेक्शन दिलेली जागा काळा- निळा पडू लागला व वेदना वाढू लागल्या. दुसर्या दिवशी पुन्हा त्याच डॉक्टरकडे गेले असता त्यांनी कंबरेत उजव्या बाजूला पुन्हा तेच इंजेक्शन दिले. यानंतर ते घरी आले असता वेदना अधिकच वाढल्या. यानंतर त्यांनी अन्य हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे त्यातच निधन झाले. डॉ. आगाडे यांनी हलगर्जीपणा केल्याचे व त्यातच रुग्ण दगावल्याचा अभिप्राय सरकारी वैद्यकीय अधिकार्यांनी नोंदवला. डॉ. आगाडे याने बिहारमधून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविल्याचेही पोलिस तपासात पुढे आले. याची दखल घेत आयोगाने आगाडे याला दोषी ठरवले. अॅड. सुधाकर औटी यांनी याबाबत बाजू मांडली.
COMMENTS