शिक्षक बँक, विकास मंडळावर ‘गुरुकुल’ची हमखास सत्ता येणार अहमदनगर | नगर सह्याद्री प्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही आर्थिक संस्था आहे. त्यामुळे श...
शिक्षक बँक, विकास मंडळावर ‘गुरुकुल’ची हमखास सत्ता येणार
अहमदनगर | नगर सह्याद्रीप्राथमिक शिक्षक सहकारी बँक ही आर्थिक संस्था आहे. त्यामुळे शिस्त आवश्यक आहेच. मात्र या पलिकडेही एकूण शिक्षकांचेही व शिक्षण क्षेत्राचे अनेक प्रश्न आहेत. बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात असलो तरी त्यानंतर सर्वानी एकत्र येऊनच काम केले पाहिजे. विधान परिषदेत आपण जावे, यासाठी शिक्षकांकडून सातत्यानें आग्रह होत आहे. तेथे प्रश्न मांडून ते सोडविले जातील. त्यामुळे शिक्षक बँकेची निवडणूक ही विधान परिषदेची रंगीत तालीम समजावी, असे प्रतिपादन शिक्षकांचे नेते, ज्येष्ठ साहित्यिक व गुरूकुल मंडळाचे प्रमुख संजय कळमकर यांनी केले.
प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक सध्या गाजते आहे. चार वेगवेगळे मंडळ या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच बरोबर विकास मंडळाचीही निवडणूक गाजत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुरूकुल मंडळाचे प्रमुख नेते संजय कळमकर यांच्याशी संवाद साधला असता विविध प्रश्नांवरील आपले मत, त्यावरील उपाययोजना याबाबत ते ‘नगर सह्याद्री’सोबत बोलते झाले. कळमकर म्हणाले, गुरूकुल मंडळ बँकेत यापूर्वी सत्तेवर होते. त्यावेळी मी संचालक मंडळात नव्हतो, पण मंडळाचा प्रमुख म्हणून कारभारावर नियंत्रण होते. मला कोणत्याही पदाचा किंवा कोणत्या लाभाचा मोह नाही. त्यापेक्षा अधिक प्रतिष्ठा साहित्य क्षेत्रात मिळत आहे. यावेळीही मी स्वतः निवडणूक लढविण्याच्या विचारात नव्हतो. परंतु आजकाल चेहर्यावर निवडणूक लढविण्याची पद्धत रूढ होत आहे. काही शिक्षक नेत्यांनाही तसे वाटू लागले. त्यामुळे आमच्याही कार्यकर्त्यांनी आग्रह केला. शिवाय पूर्वी श्रेष्ठींचा शब्द अंतिम असायचा, आता मात्र श्रेष्ठींचा मान फक्त निवडून येण्यापुरताच राहिलेला आहे. शिक्षक बँकेत ते दिसून आले आहे. त्यामुळेही निर्णय प्रक्रियेत तुम्ही स्वतः असावे, असा मोठा आग्रह झाल्याने मी स्वतः उमेदवार म्हणून रिंगणात उतरलो आहे. त्याचे सभासदांनीही स्वागत केले आहे. गुरूकुल मंडळाला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. विशेषतः महिलां सभासदांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गुरूकुल मंडळाने महिला आघाडी स्थापन केलेली आहे. मागील काळात बँकेच्या सत्तेबाहेर असलो तरी विविध उपक्रमाद्वारे मी शिक्षकांना बांधून ठेवले आहे. नारीशक्ती पुरस्काराबरोबरच महिलांसाठी विविध उपक्रम केले. शेतकर्यांसाठीही वेगवेगळे उपक्रम केले. वैचारिक व्याख्याने आयोजित केली. या निवडणुकीत पाच महिलांना उमेदवारी देणारे गुरूकुल मंडळ एकमेव आहे. दोन राखीव जागेवर असतातच, पण तीन महिलांना खुल्या जागेतूनही उमेदवारी दिली आहे.
सगळे चांगले पण...
निवडणुकीतील विरोधी मंडळांबाबत विचारले असता कळमकर यांनी कोणालाही वैयक्तिक दोष दिला नाही. सदिच्छा मंडळ त्यांच्यासोबत असलेले इब्टा यांना त्यांनी प्रामाणिक म्हणूनच गौरविले. मात्र कारभार करताना कुठे थांबायचे हे कळायला पाहिजे, तीच त्यांची चूक झाल्याचे त्यांनी सांगितले. एकमेकांवर विश्वास न राहिल्याने मंडळांचे विभाजन झाले. जे एकमेकां बरोबर होते, तेच एकमेकांवर आरोप करू लागले. रोहोकले गुरूजी यांचाही उल्लेख त्यांनी आदरपूर्वक केला, मात्र त्यांनाही सत्तेचा मोह आवरला नसल्याचे नमूद केले. राजेंद्र शिंदे यांच्याकडे राजकीय कौशल्य मोठे असल्याचा टोमणा मारतानाच कोणाचे लोक कसे फोडायचे यात तरबेज असल्याचे कळमकर म्हणाले. युवा नेतृत्त्व म्हणून बापू तांबे यांचेही कौतूक केले. मात्र कोणतीही गोष्ट घाईने मिळत नसते, त्यांनी काही दिवस जिल्हा परिषदेत जाऊन शिक्षकांच्या अडचणी सोडवाव्यात, असा सल्ला दिला.
मुलीबरोबरच मुलाच्या लग्नातही मदत देणार
शिक्षक बँकेच्या वतीने सध्या सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाते. गुरूकुल मंडळ सत्तेवर आल्यावर ही योजना अशीच सुरू राहील, पण मुलीबरोबरच मुलांच्या लग्नासाठी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच ज्यांना अपत्य नाही, त्यांनाही तेवढीच रक्कम देऊन कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. या शिवाय आयकरमध्ये सवलत मिळेल असे गृह कर्ज, महिलांची सोने खरेदी, ठेवी आणि कर्ज यावरील व्याजदर प्रमाणात ठेवणे, क्रेडिट कार्ड सुरू करणे, दोन किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षकांना एकत्रित येऊन काही व्यवसाय सुरू करावयाचा असल्यास त्यांच्यासाठी ग्रूप कर्ज अशा विविध योजनांचा उल्लेख आम्ही जाहीरनाम्यात केलेला आहे.
शिक्षकांनी प्रतिमा टिकवावी
शिक्षक बॅँका, बँकेची सर्वसाधारण सभा आदींमुळे शिक्षकांच्या प्रतिमेवर प्रश्न निर्माण केले जातात. सभासदांना माझे आवाहन आहे की त्यांनी ही निवडणूक आणि त्यासाठीचे राजकारण निवडणुकीपुरतेच मर्यादित ठेवले पाहिजे. त्यानंतर सर्वांनीच एकत्रित येऊन शिक्षकांची प्रतिमा उंचावण्याचेच काम केले पाहिजे. आपणच प्रचाराची पातळी सोडून बोलू लागले तर समाज आपल्याला बदनाम का म्हणणार नाही? शिक्षक नेते, मंडळांचे प्रमुख, उमेदवार, शिक्षक सभासद या सर्वांनीच याचे भान ठेवण्याची गरज आहे, असे मत गुरूकुल मंडळाचे प्रमुख संजय कळमकर यांनी व्यक्त केले.
आरोप-प्रत्यारोप
घड्याळ खरेदी, सात हजारांची कपात यावर सध्या प्रचारात आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याबाबत ते म्हणाले, गुरूमाऊली मंडळ एकत्रित असताना त्यांनीच घड्याळ खरेदीचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्यात फूट पडल्यावर त्यांचेच लोक घड्याळ खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे म्हणू लागले. सात हजार ठेव ठेवण्याचा निर्णय चांगलाच होता. मात्र तो घेताना त्याबाबतची पारदर्शकता योग्य ठेवली गेली नाही. काहींना या ठेवच्या पावत्या दिल्या पण मदत ठेव म्हणून देण्यात आल्या. मदत ठेव परत मिळत नसते. त्याऐवजी ती मुदत ठेव असायला हवी. मात्र महिला शिक्षकांना याची कोणतीच कल्पना नसल्याने त्यांचा याला मोठा विरोध आहे.
विकास मंडळासाठी एकत्रित कामाची गरज
शिक्षक बँकेप्रमाणेच शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यात अग्रेसर असलेल्या विकास मंडळाचीही निवडणूक आहे. त्यासाठी गुरूकुल मंडळ लढत आहे. जुन्या लोकांनी मोक्याच्या ठिकाणी विकास मंडळासाठी जागा घेतलेली आहे, पण त्यावर आम्ही साधी इमारत उभी करू शकलो नाही हे आमचे दुर्दैव आहे. मध्यंतरी त्यासाठी निधी संकलन सुरू झाले, पण काहींचा स्वाभीमान आडवा आल्याने इमारत होऊ शकली नाही. शिक्षक बँकेत आम्ही सत्तेवर आलो तरी विकास मंडळात मात्र सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार असून, प्रशस्त इमारत बांधण्याला प्राधान्य देण्यात येईल. शिक्षण क्षेत्राबरोबरच साहित्यिक म्हणून इतर ठिकाणीही आपणास प्रतिष्ठा आहे. शिक्षक बँक, विकास मंडळ येथे काम करताना या प्रतिष्ठेचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, असा आपला प्रयत्न राहील.
COMMENTS