ललित यांनी प्रक्रियेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली.
नवी दिल्ली - भारताचे सरन्यायाधीश उदय ललित यांनी आज ११ ऑक्टोबर रोजी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली. सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांच्या उपस्थितीत ललित यांनी चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्र सरकारला पाठवले.
उदय ललित हे ८ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहेत. नियमानुसार, केंद्रीय कायदा मंत्रालयाने विद्यमान सरन्यायाधीश ललित यांना पत्र पाठवून त्यांच्या उत्तराधिकारीच्या नावाची शिफारस करण्यास सांगितले होते. त्यानंतर ललित यांनी प्रक्रियेनुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून धनंजय चंद्रचूड यांच्या नावाची शिफारस केली.
धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश आहेत. ते १० नोव्हेंबर २०२४ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता त्यांना सरन्यायाधीश म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. धनंजय चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी पुढील शिक्षण आणि अमेरिकेतील प्रसिद्ध हार्वर्ड लॉ स्कूलमधून डॉक्टरेट केली. चंद्रचूड यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.
धनंजय चंद्रचूड यांनी १९९८ ते २००० पर्यंत अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून काम केले. मार्च २००० मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. महाराष्ट्र न्यायिक अकादमीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. चंद्रचूड ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. १३ मे २०१६ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
COMMENTS