न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने १२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, व्यक्ती एका वर्षापेक्षा जास्त काळ या अटीला बांधील नाही.
मुंबई/ नगर सह्याद्री - मुंबई उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या २६ वर्षीय तरुणाला जामीन मंजूर केला असून, बेपत्ता असलेली पीडित मुलगी एका वर्षाच्या आत सापडल्यास, आरोपीला तिच्याशी लग्न करावे लागेल. तथापि, न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने १२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, व्यक्ती एका वर्षापेक्षा जास्त काळ या अटीला बांधील नाही.
कोर्टाने सांगितले की, आरोपी आणि २२ वर्षीय तरुणीचे संमतीने संबंध होते, परंतु मुलगी गर्भवती होताच आरोपीने तिच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली. यानंतर तरुणीने बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मुलीने फेब्रुवारी २०२० मध्ये आरोपी विरुद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
मुलीच्या तक्रारीत, तिने दावा केला आहे की ते २०१८ पासून रिलेशनशिपमध्ये होते आणि तिच्या कुटुंबियांना याची माहिती होती आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही. २०१९ मध्ये मुलीला ती गरोदर असल्याचे समजले आणि तिने आरोपीला याची माहिती दिली, मात्र तो तिला टाळू लागला. गरोदरपणाची माहिती घरच्यांना द्यायची नसल्याने मुलीने घर सोडले.
२७ जानेवारी २०२० रोजी तिने शहरातील रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला. ३० जानेवारी रोजी महिलेने मुलाला एका इमारतीसमोर टाकले. त्यानंतर बाळाला सोडून दिल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध स्वतंत्र एफआयआर नोंदवण्यात आला. आरोपीने हायकोर्टाला आश्वासन दिले की तो मुलीशी लग्न करण्यास आणि मुलाचे पितृत्व स्वीकारण्यास तयार आहे. तथापि, पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की मुलीचा शोध घेता येत नसून आणि बाळाला आधीच दत्तक घेऊन बाल संगोपन केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की ज्या परिस्थितीत ही घटना घडली त्या परिस्थितीत पीडित मुलगी प्रौढ होती आणि तिने आधीच सांगितले आहे की हे संबंध सहमतीने होते. मी अर्जदाराची जामिनावर सुटका करणे योग्य समजते.
COMMENTS