सुकेश चंद्रशेखर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात स्थानांतरित करण्याची मागणी केली होती.
नवी दिल्ली/ नगर सह्याद्री - देशातील हायप्रोफाईल लोकांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सुकेश चंद्रशेखरला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. सुकेश चंद्रशेखर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, ज्यामध्ये त्यांनी दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात स्थानांतरित करण्याची मागणी केली होती. २३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने ठग सुकेश चंद्रशेखर आणि त्यांची पत्नी लीना पौलोज यांना दिल्लीच्या तिहार तुरुंगातून दिल्लीच्या मंडोली कारागृहात हलवण्याचे आदेश दिले होते. तिहार तुरुंगात गुंडाने त्यांच्या जीवाला धोका दिला होता. पण आता पुन्हा एकदा सुकेश मंडोली कारागृहातून दुसऱ्या कारागृहात जाण्याची विनंती करत होता पण यावेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
सीबीआयने सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात ७ ऑक्टोबर रोजी आरोपपत्र दाखल केले होते. बनावट फोन नंबरवरून खंडणी उकळल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सीबीआयने तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील सीजेएम चेंगलपट्टू यांच्यासमोर सुकेश चंद्रशेखर आणि संजय जैन उर्फ संजय चिकन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सीबीआयने मे २०२० मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा नोंदवला होता आणि २०१९ मध्ये नोंदवलेल्या एफआयआरचा तपास हाती घेतला होता.
सुकेश चंद्रशेखर २०० कोटींहून अधिक रकमेच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुकेश चंद्रशेखर हा कर्नाटकातील बंगळुरूचा रहिवासी आहे. त्याच्यावर १५ एफआयआर दाखल आहेत. सुकेशवर बंगळुरू आणि चेन्नईमध्ये अनेक कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर सुकेश व्यावसायिकांना कर्ज देण्याचे आश्वासन देत असे आणि कायदेशीर बाबी निकाली काढण्याचा दावा करायचा. २०१९ मध्ये पोलिसांनी त्याला अटक केली होती.
COMMENTS