मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले मशाल हे चिन्ह अंतरिम स्वरूपाचे असून अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या ...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मिळालेले मशाल हे चिन्ह अंतरिम स्वरूपाचे असून अंधेरी पोटनिवडणुकीनंतर त्याच्या पुनर्वाटपाबाबत विचार केला जाऊ शकतो, असे राज्य निवडणूक आयोगाने समता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेला सांगितले. मात्र, यावर समाधान न झाल्याने समता पक्षाचे राष्ट्रीय नेत्यांनी केंद्राच्या मुख्य निवडणुक आयुक्तांना पत्र पाठवून चिन्ह परत करण्याची मागणी केली आहे. तसेच न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नवीन चिन्हाचे वाटप केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ‘धगधगती मशाल’ चिन्ह दिले आहे. यावर समता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांनी आक्षेप घेतला. दिवंगत जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पक्षाकडे १९९६ पासून मशाल चिन्ह आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देवळेकर यांनी सोमवारी व मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाला ई-मेल पाठवून मशालीवर हक्क सांगितला. बुधवारी त्यांना आयोगाचे अधिकारी महेशकुमार यांनी फोन करून उद्धव ठाकरेंच्या पक्षाला फक्त अंधेरी पोटनिवडणूकीपुरतेच चिन्ह दिल्याचे सांगितले. नंतर ते खुले होईल. समता पार्टीला काही आक्षेप असल्यास न्यायालयात याचिका दाखल करूनच ते परत मिळवता येईल, असे त्यांनी सांगितले. देवळेकर यांनी राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदयकुमार मंडल यांना कळवला. मंडल यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांना मंगळवारी एक पत्र पाठवून मशाल चिन्ह परत देऊन ते समता पार्टीसाठी आरक्षित करण्याची मागणी केली. निवडणूक आयोगाने समाधानकारक निर्णय न घेतल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशाराही दिला आहे.
COMMENTS