गुरुमाऊली आघाडीचे बापूसाहेब तांबे यांनी व्यक्त केला विश्वास अहमदनगर | नगर सह्याद्री गेल्या २५ वर्षापूर्वीची आणि आत्ताची निवडणूक वेगळी आहे...
गुरुमाऊली आघाडीचे बापूसाहेब तांबे यांनी व्यक्त केला विश्वास
अहमदनगर | नगर सह्याद्रीगेल्या २५ वर्षापूर्वीची आणि आत्ताची निवडणूक वेगळी आहे. सभासद गेल्या पाच वर्षाची तुलना २५ वर्षांशी करतात. पाच वर्षात केलेल्या सभासद हिताच्या कामकाजामुळे सभासद नक्कीच अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीत गुरुमाऊली आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देतील, असा विश्वास गुरुमाऊली आघाडीचे नेते बापूसाहेब तांबे यांनी ‘नगर सह्याद्री’शी बोलतांना व्यक्त केेला.
तांबे म्हणाले, सध्या प्राथमिक शिक्षक बँक निवडणुकीची धामधूम सुरु आहे. गेल्या पंचवार्षिकनंतर सभासदांनी आमच्या ताब्यात बँकेची सत्ता दिली. त्यावेळी बँकेत कर्ज वाटण्यासाठीही पैसे नव्हते. ५९५ कोटींच्या ठेवी आम्ही १३०० कोटींपर्यंत नेल्या आहेत. कर्जाचे व्याजदर ११ टक्क्यावरून ८.७० टक्क्यांवर आणले आहे. राज्यातील इतक्या कमी व्याजदरावर कर्ज देणारी एकमेव बँक आहे. बँकेला १०४ वर्षांची परंपरा आहे. पाच वर्षात ठेवी वाढविल्या, कर्ज व्याजदर कमी केला. १०.१० टक्के लाभांश दिला. त्यामुळे आमच्या कामकाजावर सभासद खूश आहेत.
गत निवडणुकीत दिलेली आश्वासने आम्ही पूर्ण केली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत प्रचारावेळी सभासदांना काही वेगळे सांगण्याची गरज राहिली नाही. गेल्या पाच वर्षापेक्षा पुढील काळात चांगले काम केले जाईल, हा सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे. ३० वर्षापासून राज्य संघाच्या मंडळात काम करत आहे. आम्ही मूळ संघाचेच आहोत. आम्ही मूळ गुरुमाऊली मंडळाचेच आहोत. त्यांनीच दुसरी संघटना स्थापन केली आहे. निवडणुकीमध्ये प्रत्येक सभासदाने नैतिकता पाळावी, स्वच्छ चारित्र्य असणार्यांना उमेदवारांना निवडून द्यावे. गेल्या पाच वर्षात सभासद हिताचे काम केल्यामुळे सभासद चांगले काम करणार्यांच्या बाजूने नक्कीच राहतात. बँकेवर गुरुमाऊली आघाडीचीच सत्ता असेल, पण गेल्या वर्षीपेक्षा जास्त मते यावेळी मिळतील. निवडणूक चार दिवसांची असते. कोणीही व्यक्तीगत पातळीवर टीका करु नये, वाभाडे काढावेत पण त्यात अतिशयोक्ती नको असे त्यांनी सांगितले. गुरुमाऊली आघाडीमध्ये दत्तापाटील कुलट, राजकुमार साळवे, गोकुळ कळमकर, विद्युलता आढाव, रामचंद्र गायकवाड, शिवाजीराजे वाघ यांच्यासह अनेक नेतेमंडळी असल्याचे ते म्हणाले.
संजय कळमकर यांच्यासोबत चुकीची माणसे
गेल्या दोन वर्षापासून गुरुमाऊली आणि गुरुकूलची शिक्षक बँक निवडणुकीत युती होईल, असे बोलले जात होते. याबाबत गुरुमाऊली आघाडीचे नेते म्हणाले, ही चर्चा होती. गुरुकूल मंडळाचे नेते संजय कळमकर यांची उंची खूप मोठी आहे. परंतु, त्यांना चुकीची माणसे चिकटली आहेत. त्यामुळे त्यांची उंची कमी होत असल्याची खंत आहे.
COMMENTS