हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन निर्माण करुन पथविक्रेता समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री राष्ट्रीय पथविक्रेता ...
हॉकर्स झोन, नो हॉकर्स झोन निर्माण करुन पथविक्रेता समितीच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची मागणी
राष्ट्रीय पथविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम २०१४ तरतुदीनुसार हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन निर्माण करावे व महानगरपालिका पथविक्रेता समितीने केलेल्या ठरावाप्रमाणे बाजारपेठेत पथविक्रेत्यांना चार बाय चार फुटाची जागा महापालिकेने आखून देण्याच्या मागणीसाठी हॉकर्स युनिटी असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि.११ ऑटोबर) बाजारपेठेतील पथविक्रेत्यांनी महापालिकेत निदर्शने करुन महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले. तर सदर मागणी पूर्ण होत नाही, तो पर्यंत बाजारपेठेत हॉकर्सवरील नियोजित अतिक्रमणाच्या नावाखाली केली जाणारी कारवाई थांबविण्याची मागणी करण्यात आली.
या आंदोलनात हॉकर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, महापालिका पथविक्रेता समिती सदस्य शाकिर शेख, संजय झिंजे, प्रकाश पोटे, सुशांत म्हस्के, भरत गारुडकर, दानिश शेख, नईम शेख, संतोष रासने, दत्ता शिंदे, राजू खाडे, अमोल बिंगी, कल्पना शिंदे, गफ्फार शेख, नदीम शेख, नवेद शेख, नवेद शेख, रमेश ठाकूर, रईस तांबोळी आदींसह पथविक्रेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अहमदनगर महापालिका हद्दीतील पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेले आहे. मात्र राष्ट्रीय पथविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम २०१४ तरतुदीनुसार जोपर्यंत हॉकर्स झोन व नो हॉकर्स झोन निर्माण होत नाही, तोपर्यंत पथविक्रेत्यांवर कारवाई करता येत नसल्याचे नमुद आहे.
महानगरपालिका पथविक्रेता समितीच्या २ मे २०२२ ला झालेल्या बैठकित समितीने ठराव करून कापड बजार, मोची गल्ली व घास गल्ली येथील पथविक्रेत्यांना चार बाय चार फुटाची जागा महापालिकेने आखून देण्याचा ठराव केलेला आहे. राष्ट्रीय पथविक्रेता व उपजीविका संरक्षण अधिनियम २०१४ हा केंद्र सरकारचा कायदा असून, कायद्याच्या तरतुदीनुसार पथविक्रेत्यांना व्यवसाय करण्यापासून व मूलभूत हक्कापासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाने देखील राष्ट्रीय फेरीवाला धोरणाला मान्यता दिलेली आहे.
शहराच्या कापड बजार, मोची गल्ली व घास गल्ली या भागात अतिक्रमणाच्या नावाखाली, पथविक्रेत्यांचा रोजगार हिरावून घेण्याचा सातत्याने प्रयत्न सुरु आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीच्या टाळेबंदीत हातावर पोट असलेल्या पथविक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांनी कर्ज घेऊन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. काही दिवसांवर दिवाळी-दसरा सण आलेला आहे. पथविक्रेत्यांनी दिवाळीनिमित्त कर्ज घेऊन मोठी खरेदी केलेली आहे. पुन्हा त्या संघटना व मोजया व्यापार्यांनी महापालिका प्रशासनाकडे पथविक्रेत्यांना हटविण्याची मागणी सुरु केली आहे. महापालिकेने दबावाला बळी पडून पुन्हा कारवाई केल्यास पथविक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. महापालिका प्रशासनाने दबावाला बळी पडून पथविक्रेत्यांवर कारवाई केल्यास, सर्व बाजारपेठेतील पथविक्रेते आपल्या मुला-बाळांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाला देण्यात आला.
COMMENTS