मुंबई । नगर सह्याद्री - राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई पालिकेने अद्याप मंजूर केला नाही, असा आरोप लटके यांच्या वकिलांनी ...
मुंबई । नगर सह्याद्री -
राजकीय दबावापोटीच ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई पालिकेने अद्याप मंजूर केला नाही, असा आरोप लटके यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात केला. याप्रकरणी सध्या सुनावणी सुरू आहे. अडीच वाजता महापालिका आपली बाजू मांडणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतील ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई पालिकेने मंजूर केलेला नाही. त्यामुळे लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्यात अडचणी येत आहे. याविरोधात लटके यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. ऋतुजा लटके यांच्यातर्फे अॅड. विश्वजित सावंत यांनी बाजू मांडली. मुंबई पालिकेतर्फे दुपारी २.३० वाजता बाजू मांडण्यात येणार आहे.
न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. लटकेंच्या वतीने अॅड. सावंत यांनी सांगितले की, ऋतुजा लटके यांनी सर्वप्रथम २७ सप्टेंबरला राजीनामा दिला होता. पालिकेने अद्याप या राजीनाम्यावर अभिप्राय दिलेला नाही. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी लटके यांना उमेदवारी अर्ज भरायचा आहे. १४ ऑक्टोबर अर्ज भरण्याची अखेरची तारीख आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यावर वेगाने प्रक्रिया पार पडणे अपेक्षित आहे. कोर्टाने लवकरात लवकर याप्रकरणी निकाल द्यावा, अशी विनंती लटकेंतर्फे करण्यात आली.
अॅड. सावंत यांनी सांगितले की, ऋतुजा लटके यांचे पती रमेश लटके हे अंधेरी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. रमेश लटके यांच्या निधनानंतर ऋतुजा लटके यांना या जागेवरुन पोटनिवडणुकीसाठी उभे रहायचे आहे. यासाठी त्यांनी नियमाप्रमाणे मुंबई पालिकेचा प्रथम २७ सप्टेंबरला राजीनामा दिला. एक महिना पालिकेने त्यांना प्रतिसादच दिला नाही. एका महिन्यानंतर त्यांना पुन्हा राजीनामा देण्यास सांगितले. तेव्हा देखील लटके यांनी नियमाप्रमाणे ३ ऑक्टोबरला नव्याने राजीनामा दिला. ऋतुजा लटके यांच्यावर पालिकेची कोणतीही थकबाकी नाही. लटके यांनी आपला एका महिन्याचा पगारही पालिकेकडे दिला आहे. केवळ राजकीय दबावापोटी त्यांचा राजीनामा थांबवला जात असल्याचे दिसत आहे.
COMMENTS