खा. डॉ. विखे पाटलांमुळे जलजीवन मिशन योजनेतून तालुक्याला शंभर कोटींपेक्षा जास्त निधी पारनेर । नगर सह्याद्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
खा. डॉ. विखे पाटलांमुळे जलजीवन मिशन योजनेतून तालुक्याला शंभर कोटींपेक्षा जास्त निधी
पारनेर । नगर सह्याद्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या राष्ट्रीय जलजीवन मिशन या योजने अंतर्गत पारनेर तालुक्यासाठी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर झाला आहे. या योजनेतून अनेक गावांच्या पाणी योजना पूर्ण होत असून यासाठी खा. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्व. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात या पूर्वी भारत निर्माण ही योजना राबविण्यात आली. त्या अंतर्गत जिल्हा परिषद उपाध्यक्ष असताना भाळवणी, ढवळपुरी, वासुंदे, हंगा, धोत्रे, सावरगाव, वडगाव सावताळ, पळशी, टाकळी ढोकेश्वर या गावांना सुमारे 40 कोटी पेक्षा जास्त निधी आपल्याला आणता आला, असेही झावरे यांनी सांगितले. खासदार सुजय विखे पाटील यांच्यामुळे पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण, कळस, पोखरी, कर्जुले हर्या, नांदूर पठार, पाडळी दर्या, रांजणगाव मशिद, नारायण गव्हाण, पळशी, वडगाव सावताळ/ गाजदीपूर, रेनवडी, ढोकी, भाळवणी, वारणवाडी, कडुस, खडकवाडी/जांभुळवाडी, रांधे, जाधववाडी, पिंप्री जलसेन, ढवळपूरी/भनगडेवाडी, वाघुंडेबु., कुरुंद, दरोडी, म्हसे खुर्द, अळकुटी, गारखिंडी, म्हसणे सुलतानपूर, वडनेर हवेली, लोणी हवेली आदी गावातील पाणी पुरवठा योजनेसाठी सुमारे 60 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे अनेक गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मोलाचा उपयोग होणार आहे.
यापूर्वी देखील पारनेर तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत तालुक्यातील गावाला जोडणारे काही कोटी रुपयांचे रस्ते खासदार विखे यांच्यामुळे मार्गी लागले. तालुक्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत खा. विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात निधी आणला. आता राज्यातील सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूलमंत्रीसारखे महत्त्वाचे पद आहे. त्यांच्या माध्यमातून देखील तालुक्यात भरीव निधी आणण्याचे नियोजन असल्याचे झावरे यांनी सांगितले. दरम्यान, लवकरच खासदार सुजय विखे पाटील यांचा सर्व गावांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
COMMENTS