१० लाख प्राथमिक सदस्य आपल्याकडे असल्याचा ठाकरे गटाचा दावा मुंबई । नगर सह्याद्री - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब...
१० लाख प्राथमिक सदस्य आपल्याकडे असल्याचा ठाकरे गटाचा दावा
मुंबई । नगर सह्याद्री -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे किती आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत हे आता उघड झाले आहे. त्यामुळे शिवसेना संघटनेत दोन तृतीयांश फूट पडली आहे का, याचा निर्णय घेणे निवडणूक आयोगाला सोपे होणार आहे.
१२ लाख प्राथमिक सदस्यांपैकी १० लाख प्राथमिक सदस्य आपल्यासोबत असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या दस्तऐवजात उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे १४ आमदार, १२ विधान परिषद सदस्य, ७ खासदार आणि ३ राज्यसभा सदस्य आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे १२ लाख प्राथमिक सदस्य आहेत. त्यापैकी १० लाख सदस्य उद्धव ठाकरे गटाकडे आहेत. मुख्यमंत्री शिंदे गटाकडे केवळ १.६ लाख सदस्य आहेत. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये असे म्हटले आहे. याशिवाय संघटनेचे २.६ लाख पदाधिकारीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. २९ प्रदेशाध्यक्षांपैकी १८ आपल्यासोबत आहेत, तर केवळ ११ मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीतील २३४ सदस्यांपैकी १६० सदस्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार आणि १२ खासदार असल्याच्या दाव्यावर ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, या लोकांविरुद्धची अपात्रता याचिका विचाराधीन आहे. त्यामुळे त्यांची गणती शिंदे यांच्याकडे केली जाऊ नये. उद्धव ठाकरे गटाकडून केलेल्या दाव्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले, ८ ऑगस्ट २०२२ रोजी आम्ही निवडणूक आयोगाकडे ३२ हजारांहून अधिक प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. २३ ऑगस्ट २०२२ रोजी आम्ही आयोगाला १.२१ लाखांहून अधिक प्रतिज्ञापत्रे दिली. यानंतर २३ सप्टेंबर २०२२ रोजी आम्ही ११ प्रदेशाध्यक्षांना शपथ दिली होती. तसेच सुमारे आठ ते साडेआठ लाख प्राथमिक सदस्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. तेही निवडणूक आयोगाला दिले आहे.
COMMENTS