मुंबई | नगर सह्याद्री अंधेरी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ठिकाणचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झा...
मुंबई | नगर सह्याद्री
अंधेरी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या ठिकाणचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी आता उद्धव ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांचा महापालिकेतील सेवेचा राजीनामा जाणूनबुजून मंजूर केला जात नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामागे शिंदे गटाचे षडयंत्र असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
परब म्हणाले, शिवसेनेच्यावतीनं ऋतुजा रमेश लटके यांची उमेदवारी जाहीर केली होती. रमेश लटके हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. शिवसेनेचं शाखा प्रमुख म्हणून त्यांनी अंधेरीत काम सुरु केलं होतं. तीन टर्म ते नगरसेवक होते. त्यानंतर ते आमदार झाले. कडवा शिवसैनिक म्हणून त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून शिवसेनेच्यावतीनं त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यांच्या पत्नी महापालिकेत लिपिक म्हणून काम करतात. त्यांना आम्ही उमेदवारी देऊ असं सांगितलं त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, निवडणूक झाल्यानंतर माझा राजीनामा मंजूर करावा. पण राजीनामा देण्याची ही पद्धत नाही, असं उत्तर महापालिकेनं देत त्यांना पुन्हा नव्यानं राजीनामा देण्यास सांगितला, तसा त्यांनी पुन्हा राजीनामा दिला. पालिकेचा असा नियम आहे की एक महिना आधी राजीनाम्याची सुचना द्यावी लागते. जर एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत नसेल तर तुम्हाला एक महिन्याचा पगार ट्रेझरीत द्यावा लागतो.
लटकेंनाच शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न
अंधेरी पोटनिवडणूक ठाकरे आणि शिंदे गटाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, ठाकरे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. ऋतुजा लटके यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, हा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. सहा विभागांची एनओसी नसल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. मात्र, प्रशासनावर शिंदे सरकारचा दबाव असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारला जात नाही. आता या प्रकरणात शिवसेना कोर्टात जाणार आहे. राजीनामा मंजूर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात दाद मागणार आहे. कोर्टांच्या निकालानंतर अर्जांची तारीख ठरणार आहोत, अशी माहिती पेडणेकर यांनी दिली. शिंदे गटाकडून लटके यांच्यावर दबाव असल्याचा ठाकरे गटाकडून आरोप आहे.
ऋतुजा लटकेंच्या राजीनाम्यासाठी ठाकरे गट हायकोर्टात
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने मंजूर करावा, यासाठी ठाकरे गटाने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. स्वत: ऋतुजा लटके यांनी आज न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आता जेमतेम दोन दिवस बाकी आहे. यापार्श्वभूमीवर उच्च न्यायालय काय फैसला देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठाकरे गटातर्फे आमदार अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारच्या दबावामुळे लटके यांचा राजीनामा महापालिकेचे अधिकारी मंजूर करत नसल्याचा आरोप केला. तसेच, ऋतुजा लटके यांनी शिंदे गटाकडे यावे यासाठी त्यांना मंत्रिपदाचेही आमिष दाखवले गेले, असाही आरोप केला.
लटके दबावाला बळी पडणार नाहीत
अनिल परब म्हणाले की, ऋतुजा लटके यांच्यावर शिंदे गटाकडून दबाव टाकला जात आहे. आमच्याकडून निवडणूक लढणार असाल तर राजीनामा मंजूर करू, असे लटकेंना सांगितले जात आहे. मंत्रिपदाचेही आमिष दिले जात आहे. मात्र, लटकेंना घाबरण्याचे कारण नाही. शिवसेना त्यांच्यासोबत आहे. लटके कुटुंब हे शिवसेनेशी प्रामाणिक आहे. त्यामुळे ते शिंदे गटाच्या दबावाला बळी पडणार नाही, याची खात्री आहे.
नियमानुसार राजीनामा दिला
अनिल परब म्हणाले, ऋतुजा लटके या मुंबई पालिकेत लिपिक पदावर कार्यरत आहेत. त्यांचे पती रमेश लटके हे निष्ठावान शिवसैनिक होते. शिवसैनिक ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर लटके कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवसेना या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहीली व रमेश लटके यांच्या पत्नीला अंधेरी पोटनिवडणुकीची उमेदवारी दिली. नियमानुसार निवडणुकीच्या ३ महिने आधी राजीनामा द्यावा लागतो. त्यानुसार ऋतुजा लटकेंनी २ सप्टेंबरला राजीनामा दिला होता.
पालिकेकडे पगारही जमा केला
अनिल परब यांनी सांगितले की, ऋतुजा लटकेंनी ऑक्टोबरमध्ये राजीनामा देऊनही पालिकेने एक महिना त्यांना कोणतेच उत्तर दिले नाही. एक महिना संपल्यानंतर तुम्ही चुकीच्या पद्धतीने राजीनामा दिला, असे सांगण्यात आले. त्यानंतर नियमाप्रमाणे ऋतुजा लटके यांनी पुन्हा ३ ऑक्टोबरला नव्याने राजीनामा दिला. पालिकेच्या सेवाशर्तीनुसार राजीनाम्यासाठी तुम्हाला एक महिना आधी सूचना द्यावी लागते. अन्यथा तातडीच्या राजीनाम्यासाठी एका महिन्याचा पगार पालिकेकडे जमा करावा लागतो. पालिकेच्या चुकीमुळे लटके यांना पुन्हा ऑक्टोबरमध्ये राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे एक महिना पूर्ण होत नसल्याने त्यांनी नियमाप्रमाणे एका महिन्याचा पगारही पालिकेकडे जमा केला होता.
आयुक्तांवर सरकारचा दबाव
अनिल परब म्हणाले, लटके यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. त्यांच्याकडे महापालिकेचे कोणतेही देय नाही. तरीही पालिका आयुक्त राजीनामा का मंजूर करत नाही. त्यांच्यावर निश्चितच शिंदे सरकारचा दबाव आहे. मुळात ऋतुजा लटके या 'क' गटातील कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा सहाय्यक पालिका आयुक्तही मंजूर करु शकतात. अशात हे प्रकरण आयुक्तांकडे गेलेच कसे?,असा सवाल परब यांनी केला.
COMMENTS