मुंबई । नगर सह्याद्री - दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राज्यभरातील रेशन दुकानदारांना 100 रुपयांच्या किटचे अद्याप वाटप करण्यात आलेले न...
मुंबई । नगर सह्याद्री -
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. राज्यभरातील रेशन दुकानदारांना 100 रुपयांच्या किटचे अद्याप वाटप करण्यात आलेले नाही. राज्य सरकारने या किटमध्ये 100 रुपयांत एक किलो रवा, साखर, तेल, डाळ देण्याची घोषणा केली आहे.
दिवाळीच्या तोंडावरही रेशन दुकानदारांना अद्याप या वस्तूंचा पुरवठाच झालेला नाही. लोक वारंवार दुकानात येऊन वस्तूंबाबत विचारणा करत आहे. अनेकजण हवालदिल होऊ शिवीगाळही करत असल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे. त्यामुळे रेशन दुकानदार त्रस्त झाले आहे.
रेशन दुकानदार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डी. एन. पाटील यांनी सांगितले की, संघटनेचे राज्यभरात 55 हजार रेशन दुकाने आहे. पुरवठा विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी रेशन दुकानदारांना पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात रेशन दुकानांपर्यंत या वस्तू पोहोचलेल्या नाही. पुरवठा विभागाकडेच अद्याप साखर आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचीदेखील अडचण झाल्याचे समजते आहे.
एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात 5 लाख 57 हजार 855 शिधापत्रिकाधारक आहे. हे सर्व लाभार्थी या किटच्या प्रतीक्षेत आहे. या लाभार्थ्यांमध्ये अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका - 66195, प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक - 416784 आणि शेतकरी शिधापत्रिका- 74876 कुटुंबे आहे. सध्या खुल्या बाजारात एक किलो साखरेसाठी 39 रुपये, एक किलो रव्यासाठी 40 रुपये, एक किलो पामतेल 110 रुपये, हरभरा डाळ 65 रुपये किलो असा दर आहे. म्हणजे बाजारात यासाठी 254 रुपये मोजावे लागतील. ते सरकारी किटमध्ये फक्त 100 रुपयांत मिळणार आहे.
रेशन दुकानदार संघटनेचे राज्याचे अध्यक्ष डी.एन.पाटील यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात 1800 दुकाने आहे. मात्र गुरुवारी सकाळी साडे दहावाजेपर्यंत दुकानदारांना पुरवठा झालेला नाही. प्रशासनाकडे अजून साखरेचा पुरवठा झाला नाही. इतर तीन वस्तू पुरवठा विभागाकडे आल्या असल्या तरी साखरेमुळे त्यांची अडचण झाल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
100 रुपये किटच्या वस्तु मिळाव्यात यासाठी प्रत्येक दुकानदाराने पैसे भरलेले आहे. एका कीटसाठी 94 रुपये भरण्यात आले आहे. दुकानदाराला एका कीटच्या माध्यमातून सहा रुपयाचे कमिशन मिळते आहे. औरंगाबाद शहरात प्रत्येक दुकानदाराने साधारण 70 ते 80 हजार रुपये भरलेले आहेत. मात्र अजूनही रेशनवर माल आलेला नाही. त्यामुळे नागरिक रेशन दुकानदारांनाच सातत्याने विचारणा करत आहे.
COMMENTS