मुंबई । नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल ...
मुंबई । नगर सह्याद्री -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ही याचिका गौरी भिडे यांनी दाखल केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता त्याच गौरी भिडे यांच्या जीवाला धोका असल्याचा सूचक इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
आमदार नितेश राणे यांनी याबाबत एक सूचक ट्विट केले आहे. यात उद्धव ठाकरेंविरोधातील याचिकाकर्त्या गौरी भिडे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. नितेश राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, गौरी भिडे यांच्या जीवाचे रक्षण होणे महत्त्वाचे असून त्यांना महाराष्ट्र शासनाने संरक्षण देण्याची गरज आहे. दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत आणि मनसुख हिरेन यांच्याबाबत काय झाले ते आम्हाला माहिती आहे. असे सूचक ट्वीट करत त्यांनी गौरी भिडे यांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
गौरी भिडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेड आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचे नेमके स्त्रोत काय आहेत? हा प्रश्न त्यांनी याचिकेद्वारे उपस्थित केला आहे. यासोबतच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राला कोरोना काळात इतका फायदा कसा काय झाला? हा प्रश्नही याचिकेत विचारण्यात आला आहे. सोबतच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना 2020 ते 2022 या कोरोना काळात सामना वृत्तपत्राचा टर्नओव्हर 42 कोटी रुपये इतका होता. ज्यात झालेल्या साडे अकरा कोटी रुपयांच्या नफ्यावरदेखील प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. शिवाय उद्धव ठाकरे कुटुंबाच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय? असा सवाल विचारताना त्यांच्या उत्पन्नाच्या स्त्रोताची चौकशी व्हावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
गौरी भिडे एक या प्रकाशक आहे. त्यांच्या आजोबांचे 'राजमुद्रा' नावाचे प्रकाशन आहे. त्यांनी ठाकरे कुटुंबियांवरोधात याचिका दाखल केल्यानंतर त्या प्रसिद्धीझोतात आल्या आहे. सामना वृत्तपत्र आणि मार्मिक या मासिकाच्या विक्रीतून एवढी संपत्ती गोळा करणे अशक्य असल्याचा आरोप गौरी भिडे यांनी केला आहे. आपलाही हाच व्यवसाय असून दोघांच्या उत्पन्नात एवढा फरक कसा? असा सवाल गौरी भिडे यांनी उपस्थित केला आहे.
COMMENTS