मुंबई । नगर सह्याद्री - अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेच्या दोन्ही गटांत राजकारण सुरु आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात...
मुंबई । नगर सह्याद्री -
अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेच्या दोन्ही गटांत राजकारण सुरु आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणून त्यांना उमेदवारी देण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंना शह देण्यासाठी शिंदेंची ही नवी रणनीती आखल्याची माहिती आहे. लटके यांना शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप युतीकडून उमेदवारी द्यावी, यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मूरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज अजूनही भाजपकडून भरला गेला नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता फक्त दोनच दिवस शिल्लक आहे. गुरुवारी ठाकरे गटाकडून (शिवसेना : उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती अनिल परब यांनी दिली आहे. मात्र अद्याप ऋतुजा लटके यांचा राजीनामा प्रलंबित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट ठाकरेंना धक्का देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीपुढे प्रशासकीय अडचण निर्माण झाली आहे. मुंबई महानगर पालिकेत कार्यरत असलेल्या ऋतुजा लटके यांनी राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा मंजूर होईपर्यंत त्यांना निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही.
COMMENTS