मुंबई । नगर सह्याद्री - अभिनेते गजराज राव यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'बधाई हो' ...
मुंबई । नगर सह्याद्री -
अभिनेते गजराज राव यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'बधाई हो' हा चित्रपट त्यांच्यासाठी एक माईल स्टोन ठरला. या चित्रपटानंतर त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. अनेक चित्रपटांमध्ये गजराज यांना मोठ्या भूमिका मिळू लागल्या आहे. नुकताच त्यांचा 'मजा मा' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्यांनी बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितसोबत काम केले आहे. गजराज राव यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. गजराज राव यांनी कधीही असा विचार केला नव्हता की, त्यांना माधुरी दीक्षितसारख्या अभिनेत्रीचा हिरो म्हणून कास्ट केले जाईल. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
गजराज यांनी सांगितले की, "मी कधीही विचार केला नव्हता की हे शक्य होईल. जेव्हा आनंद तिवारी यांनी मला हा रोल ऑफर केला तेव्हा मला वाटले की चित्रपटात एक छोटी भूमिका असेल, परंतु जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा मला कळाले की मला माधुरीच्या नवऱ्याचा रोल करायचा आहे. अमेरिकेतील माझ्या मित्राला यावर विश्वासच बसत नव्हता. त्याने फोन करून मला विचारले, गज्जू, तुला खरंच माधुरी दीक्षितच्या नवऱ्याच्या भूमिकेत कास्ट करणार आहेत का? तू तिचा हिरो आहेस का?"
गजराज पुढे म्हणाले की, मी माझ्या मित्रांना म्हणालो की ही हिरो-हिरोईनची गोष्ट नाही आहे. ही एक कौटुंबिक कथा आहे. मी शाहरुख खान, अनिल कपूर यांसारख्या हिरो नाहीये. अशा भूमिका करण्यासाठी तुमच्याकडे विशिष्ट टॅलेंट असावे लागते आणि ते माझ्याकडे नाहीये. मी थोडा अभिनय करू शकतो आणि मला आनंद आहे की मला हे पात्र करायला मिळत आहे.
'माधुरीबरोबर काम करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही टेनिस बॉलने गल्ली क्रिकेट खेळता आणि तुम्हाला कोणी म्हणत की गजराज आता तुला वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरसोबत एक प्रॉपर मॅच खेळायला मिळेल... अशी काहीतरी माझी भावना होती. माधुरी चित्रपटांसाठी तेच आहे जे सचिन तेंडुलकर क्रिकेटसाठी आहे. दोघेही आपापल्या कलांमध्ये उत्कृष्ट आहे.
'मजा मा' चित्रपटात माधुरी दीक्षित आणि गजराज व्यतिरिक्त रित्विक भौमिक, बरखा सिंह, सृष्टी श्रीवास्तव, रजित कपूर, शीबा चड्ढा, सिमोन सिंह इत्यादी कलाकार आहेत. आनंद तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे.
COMMENTS