मुंबई । नगर सह्याद्री - दिवाळी हा सण दरवर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. हा सण आपल्या मूळ गाव...
मुंबई । नगर सह्याद्री -
दिवाळी हा सण दरवर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जातो. हा सण आपल्या मूळ गावी जात साजरा करण्याकडे बहुतांश नागरिकांचा कल असतो. परिणामी सार्वजनिक वाहतूक साधनांना या काळात प्रचंड मागणी असते. एसटी बसमध्येही या काळात गर्दी असते. सणासुदी निमित्त सर्वजण आपल्या गावी जात असतात अशातच काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळाने गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी प्रवासासाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आज मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.
एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत कायम राहणार असून सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागून राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.
एसटी महामंडळाकडून साधारणपणे ५ ते ७५ रुपयांपर्यंत भाडेवाढ होणार आहे. ज्या प्रवाशांनी एसटी प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केले आहे. त्या प्रवाशांकडून वाहकाद्वारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एस.टी.च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेंबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे.
दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता कुटुंबीय आणि मित्र परिवारासह पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात 'दिवाळी स्पेशल' १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ऑक्टोबरते ३१ ऑक्टोबर या दरम्यान अतिरिक्त गाड्या धावणार आहे. अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.
COMMENTS