मुंबई । नगर सह्याद्री - ऋतुजा लटके यांचा राजीनामा महानगरपालिका स्वीकारता नसल्याने काल मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाननंतर अखेर मुंबई महापालिके...
मुंबई । नगर सह्याद्री -
ऋतुजा लटके यांचा राजीनामा महानगरपालिका स्वीकारता नसल्याने काल मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाननंतर अखेर मुंबई महापालिकेने शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा स्वीकारला आहे. तसं पत्र सुद्धा लटके यांना महापालिकेकडून देण्यात आले आहे. हे पत्र घेण्यासाठी ऋतुजा लटके या स्वत: महापालिकेत आल्या होत्या. राजीनामा स्वीकारल्यानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
'आज मी 9 वाजता घरातून निघाले आणि 10 वाजता मुंबई महापालिकेत पोहचले. आता महापालिकेने मला माझा राजीनामा मंजूर केल्याचे पत्र दिलेले आहे. याबद्दल मी महापालिकेच्या जीएडी विभागाचे आभार मानते. जशी कोर्टाची ऑर्डर होती तसं त्यांनी मला सहकार्य केले आहे. याबाबत मी त्यांचे आभार मानते', असं ऋतुजा लटके यांनी म्हटले आहे.
'राजीनाम्यासाठी मला संघर्ष करावा लागला, माझी अजिबात इच्छाही नव्हती आणि मला कधी असं वाटलंही नव्हतं, असा संघर्ष करावा लागेल. आज मी एक लिपीक आहे आणि लिपीकाच्या राजीनाम्याकरिता एवढ्या मोठ्या गोष्टी आपल्याला आयुक्तांकडे न्याव्या लागतात. याचे मला जरा जास्त आश्चर्य वाटतं', असंही ऋतुजा लटके यांनी म्हटले आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत. अंधेरी पूर्व विधानसभेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती.
त्यानंतर निवडणूक आयोगाने या जागेवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनीही निवडणुकीत उतरण्यासाठी महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. आता ऋतुजा लटके या आज दुपारी निवडणूक अर्ज भरणार असून अंधेरी पोटनिवडणुकीत त्यांची लढत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्याशी होईल.
COMMENTS