मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय ...
मुंबई / नगर सह्याद्री -
शिवसेनेतील फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा धनुष्य-बाण हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय दिला आहे. मात्र हा आदेश हंगामी स्वरुपाचा असणार आहे. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना मोठा धक्का बसला आहे. तसेच काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. निवडणूक आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक आहे. अशाचत आता शिवसेनेने थेट सर्वोच्च न्यायालयात (supreme court) दाद मागण्याची तयारी केल्याची माहिती समोर आली आहे.
या सर्व निर्यणांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरे यांनी जिंकून दाखवणारच असे म्हटले आहे.
तर आदित्य ठाकरे यांनी या निर्यणानंतर प्रतिक्रिया देताना शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. "खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही. लढणार आणि जिंकणारच! आम्ही सत्याच्या बाजूने! सत्यमेव जयते," असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, शनिवारी निवडणूक आयोगाने चार तासांच्या बैठकीनंतर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शिवसेना हे पक्षाचे नाव वापरण्यासही दोन्ही गटांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना नव्या नावाची आणि नव्या निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे. 10 ऑक्टोबरला नवीन नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय सादर करण्याचा आदेश आयोगाने दिले आहेत.
COMMENTS