मुंबई । नगर सह्याद्री भेसळयुक्त तूप आणि खाद्यतेलाचा साठा जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने आता भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे. दिवाळीच्...
मुंबई । नगर सह्याद्री
भेसळयुक्त तूप आणि खाद्यतेलाचा साठा जप्त केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने आता भेसळयुक्त मिठाई जप्त केली आहे.
दिवाळीच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) करण्यात येणार्या अन्न पदार्थांच्या विशेष तपासणी मोहिमेला वेग आला आहे. प्रशासनाकडून मुंबईत नुकत्याच केलेल्या कारवाईत अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात येत असलेली आणि विनापरवाना उत्पादन-विक्री करण्यात येत असलेली मिठाई जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेला साठा २३ लाख ७१ हजार २६९ रुपये इतया किंमतीचा आहे. काही दिवसांपूर्वीच अन्न व औषध प्रशासनाने भेसळयुक्त तूप आणि खाद्यतेलाचा साठा जप्त केला होता.
एफडीएला मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी एफडीए अधिकार्यांनी चेंबूर छेडानगर येथील मेसर्स स्वीट मॅन्युफॅचरिंग या आस्थापनेवर छापा टाकला. त्यावेळी अत्यंत अस्वच्छ वातावरणात आणि विनापरवाना मिठाई तयार केली जात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अधिकार्यांनी २३ लाख ७१ हजार २६९ किलोचा साठा जप्त केला. यात मावा चॉकलेट बर्फी ७० किलो (रु. २८००० किंमत), मावा पेढा २८ किलो (रु. ११,२०० किंमत), मावा फॅन्सी ९०८ किलो (रु. ३,३६,२०० किंमत), काजू फॅन्सी १४७८ किलो (रु. १०,३६,६०० किंमत), काजू कत्तली ८९८ किलो (रु. ६,२८,६०० किंमत), काजू कत्तली पाईनऍपल १८ किलो (रु. १२,६०० किंमत), मावा कुंदा २९८ किलो (रु. १,१९,२०० किंमत) यासह अन्य प्रकारच्या मिठाईचा समावेश आहे.
जप्त करण्यात आलेल्या मिठाईचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात येत आहे. ग्राहकांनी दिवाळीच्या निमित्ताने अन्न पदार्थांची खरेदी करताना विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन एफडीएने केले आहे.
COMMENTS