राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या शहर जिल्हाध्यक्षपदी साळुंखे यांची वर्णी अहमदनगर । नगर सह्याद्री राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाच्या ...
राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या शहर जिल्हाध्यक्षपदी साळुंखे यांची वर्णी
अहमदनगर । नगर सह्याद्री
राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्या राष्ट्रीय मजदूर काँग्रेस इंटकच्या अहमदनगर शहर जिल्हाध्यक्षपदी युवा कामगार नेते मच्छिंद्र साळुंखे यांची वर्णी लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते एमआयडीसीतील कामगारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत आहेत. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या शिफारशीने माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माजी आ. जयप्रकाश छाजेड यांनी मुंबईतून साळुंखे यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. नियुक्तीचे पत्र माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते संगमनेर येथे प्रदान करण्यात आले.
यावेळी काळे यांच्यासह नाशिक पदवीधर मतदार संघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रतिनिधी डॉ.जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे सभापती अजय फटांगरे, सावेडी काँग्रेस विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ही देशातील सर्वात जुनी कामगार संघटना असून सन 1947 ची इंटकची स्थापना आहे. ही संघटना आंतरराष्ट्रीय कामगार संघाशी संलग्न आहे. संघटनेचे आज रोजी संबंध देशात सुमारे एकूण 3 कोटी 39 लाख 50 हजार कामगार सभासद आहेत. मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे.
गेल्या काही कालावधीपासून हे पद रिक्त होते. अनेकजण या पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुक होते. मात्र अखेर काळे यांच्या शिफारशीनंतर साळुंखे यांना पक्षाने संधी दिली आहे. निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना साळुंखे म्हणाले की, नगर एमआयडीसी येथील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी काळे यांच्या नेतृत्वाखाली काम केले जाईल. सात - आठ वर्षांपासून एमआयडीसीतील कामगारांना कामगार संघटांच्या नावाखाली काही राजकीय वरदहस्त असणार्या तथाकथित कामगार संघटनांच्या टोळ्या या कामगारांना त्याचप्रमाणे उद्योजकांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत.
लवकरच कार्यकारिणी गठीत करणार
इंटकमध्ये पूर्वीपासून काम करणार्या कामगार नेते, कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. सर्वांना विश्वासात घेतले जाईल. जुन्यांना बरोबर घेत असताना नवीन कामगार नेतृत्वाला कार्यकारणी गठीत करीत असताना त्यामध्ये स्थान दिले जाईल. एसटी संघटना, एमआयडीसीतील कामगार संघटना, शहरातील वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे कामगार अशा सर्व प्रकारच्या कामगारांना कार्यकारणीमध्ये किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थान देत शहरात कामगारांचे मजबूत संघटन उभे केले जाईल, असे मच्छिंद्र साळुंखे यांनी म्हटले आहे.
COMMENTS