अहमदनगर । नगर सह्याद्री माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक...
अहमदनगर । नगर सह्याद्री
माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र लांडे, सचिव आप्पासाहेब शिंदे, आबासाहेब कोकाटे, महेंद्र हिंगे, बद्रीनाथ शिंदे, हरिश्चंद्र नलगे, बाळासाहेब भोर, देविदास पालवे, जनार्दन पठारे, अशोक सोनवणे, अर्जुन भुजबळ, उद्धव गायकवाड, जगन्नाथ आढाव, राजेंद्र खेडकर, नाना डोंगरे, रमाकांत दरेकर आदी सहभागी झाले होते.
राज्यातील माध्यमिक शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन आदेशान्वये राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
कोरोना काळातील दिवंगत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वारसांना नियमानुसार देय सानुग्रह मदत तसेच शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा योजनेतंर्गत सेवेची संधी द्यावी, डीसीपीएस, एनपीएस योजना रद्द करुन त्याऐवजी जुनी पेन्शन योजना 2005 पासून लागू करावी, त्यासाठी डीसीपीएस, एनपीएस खात्यातील जमा रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात आरंभाची शिल्लक या शीर्षकाखाली वर्ग करण्यात यावी, वेतन अनुदानासाठी अघोषित व घोषित शाळा, तुकड्यांना अनुदान त्वरित लागू करावे व त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यात यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी वय वर्षे 55 पेक्षा अधिक असलेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच प्रशिक्षण अटीतून वगळण्यात यावे, प्रशिक्षण न झाल्याच्या कारणाने संबंधितांचे पेन्शन प्रस्ताव नाकारण्यात येऊ नये, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये, राज्यातील हजारो शिक्षक, शिक्षकेतर यांना शासनाकडून देय थकीत वेतन, फरकाची बिले, वैद्यकीय प्रतिपूर्ती, वेतन आयोग, फरकाची एक, दोन, तीन हप्त्याची बिले त्वरीत मंजुर करण्यात यावी या मागण्यांसह पंधरा मागण्यांचे निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात देण्यात आले.
COMMENTS