पारनेर । नगर सह्याद्री पारनेर तालुक्यात पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि पंचनामे करण्याचे आदेश देण्य...
पारनेर । नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यात पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी आणि पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असले तरी हे चुकीचे आहे. आता शेतकर्यांना थेट मदतीची गरज असल्याने पंचनाम्याचे नाटक न करता शेतकर्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासुन जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. शेतातील बाजरी, सोयाबीन, मुग आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच साठवलेल्या कांद्याचे आणि लागवडीसाठी तयार केलेल्या कांद्याची रोपे नष्ट झाली आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते देखील पुराने वाहुन गेलेले आहेत. शेतकर्यांच्या ऐन दिवाळीच्या काळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना मदत करण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना पंचनामे म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे राहुल झावरे म्हणाले. नुकसानीचे पंचनामे न करता थेट मदत करण्याची मागणी झावरे यांनी केली आहे.
पंचनामे ई पीक पाहणी अॅपच्या मदतीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील अनेक भागात सर्व्हर डाऊन असल्याने ई पीक पाहणी अॅप चालत नाही. आधीच पावसाने झालेले नुकसान आणि या नुकसानीची मदत मिळणार असल्याचे सांगत येत असताना ई पीक पाहणी अॅप चालत नसल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना थेट मदत करावी, असे पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांनी म्हटले आहे.
COMMENTS