सदिच्छा मंडळाचे राजेंद्र शिंदे आणि इब्टाचे आबा लोंढे यांचे गंभीर आरोप / सदिच्छा, इब्टाच निवडून येणार असल्याचा विश्वास अहमदनगर | नगर सह्याद्...
सदिच्छा मंडळाचे राजेंद्र शिंदे आणि इब्टाचे आबा लोंढे यांचे गंभीर आरोप / सदिच्छा, इब्टाच निवडून येणार असल्याचा विश्वास
अहमदनगर | नगर सह्याद्री
सभासदांची दिशाभूल करून प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्तेवर आलेल्या गुरूमाऊलीची गुरू‘मवाली’ आणि गुरूकुलची गुरू‘मनी’ कधी झाली, हे त्यांनाही समजले नाही. सत्तेचा वापर या दोन्ही मंडळांनी सभासदांचे हित पाहण्यासाठी नव्हे तर स्वतःची घरे भरण्यासाठी केला. सत्तेत आल्यानंतर पदे उपभोगण्यासाठी आणि स्वतःचे आस्तित्त्व टिकविण्यासाठी एकमेकांवर आरोप करत बाहेर पडले. या सर्वांची मातृसंस्था सदिच्छा मंडळ आहे, याचा विसर यांनी पडू देऊ नये. सभासदांचा विश्वासघात हाच यांचा धंदा असल्याने यावेळी सभासद मंडळी सदिच्छा मंडळ, इब्टासह विविध संघटनांच्या पॅनेलला साथ देऊन सत्ता देतील, असा विश्वास सदिच्छा मंडळाचे राजेंद्र शिंदे आणि इब्टाचे आबा लोंढे यांनी ‘नगर सह्याद्री’सोबत बोलताना व्यक्त केला.
प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक अखेरच्या टप्प्यावर आली आहे. जिल्हाभरातील शिक्षकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या संदर्भात शिंदे आणि लोंढे यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, सदिच्छावर आरोप करून ही मंडळी सत्तेसाठी एकत्रित आली. सभासदांनी विश्वासाने सत्ता दिली, पण हव्यासापायी हे एकत्र राहिले नाहीत. त्यांच्यातही विभागणी झाली. मागीलवेळी गुरूमाऊली एकत्रित होती, आता त्यांच्यात विभागणी झाल्याने मतांमध्येही विभागणी झाली आहे. या मंडळाने सत्ता मिळाल्याच्या पहिल्या दिवसांपासून सभासदांच्या ठेवीवर घाला घातला आहे. एवढेच नव्हे तर विकास मंडळाच्या इमारतीसाठी दहा हजार वसूल करण्याचाही यांचा डाव होता. मात्र त्यातही वाद घातल्याने ते थांबविण्यात आले. विश्वासघात किती करावा, यालाही मर्यादा आहेत. संचालक प्रवास भत्ते घेणार नाहीत, असे सांगायचे आणि सत्ता येताच त्यात बदल करून प्रवासभत्ते उकळायचे, असे यांचे धंदे आहेत. कोरोना काळात सर्वत्र संचारबंदी होती, प्रवासाला बंधने होती, पण त्या काळातही यांनी प्रवासभत्ता म्हणून ६२ लाख रूपये खर्च केले आहेत. कोरोना काळात नेमका कुठे प्रवास केला, हे त्यांनी सांगावे.
रोहोकले अन्याय करणारे
सेवानिवृत्तीनंतर आपली सोय व्हावी, यासाठी रोहोकले गुरूजी यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांचा उदय उशीराने झालेला आहे. त्यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचा त्यांनी फक्त वापर करून घेतला. कोणतीच बँक जामीनदाराशिवाय कर्ज देत नसते, मात्र हे विना जामीनदार कर्ज देण्याचे आश्वासन देत आहेत. रोहोकले गुरूजी यांनी विकास मंडळातही अनेक उद्योग करत सेवानिवृत्तीनंतर आपली सोय व्हावी, यासाठी प्रयत्न केले. शिक्षक बँकेत सेवानिवृत्त झाल्यानंतर संचालक, चेअरमन राहता यावे, यासाठी आपल्या सहकार्याला कोर्टात पाठविले. तेथेही त्यांना हार पत्करावी लागली. विकास मंडळात अगोदर सेवानिवृत्त शिक्षक स्वीकृत सदस्यपदी नको, असे रोहोकले म्हणायचे आणि ते सेवानिवृत्त झाल्यानंतर स्वतः मात्र स्वीकृत संचालक झाले. विकास मंडळाची स्वतःची जागा असतानाही इमारतीचे इस्टिमेट मोठ्या प्रमाणात वाढविले. निविदा मागविल्यानंतर त्यातील कमी खर्चाच्या निविदेला फेटाळून मित्र असलेल्या पण जास्तीचा खर्च नमूद केलेल्या निविदेला मान्यता दिली. एनटी, ओबीसी यांचे प्रतिनिधीत्त्व त्यांनी संपुष्टात आणले, असे गंभीर आरोप राजेंद्र शिंदे आणि आबा लोंढे यांनी केले.
गुरूकुलने पुरस्कारासाठी पैसे घेतले
संजय कळमकर यांच्या नेतृत्त्वाखालील गुरूकुल मंडळावरही गंभीर आरोप राजेंद्र शिंदे यांनी केले. नारीशक्ती पुरस्कार देताना त्यासाठी दहा लाख रूपये बँकेतून खर्च केले. ज्यांना पुरस्कार द्यायचे, त्यांच्याकडूनही पैसे घेतले. गुरूकुल हे एकदा सत्तेवर आले, ते देखील अपघाताने आले. सभासदांचा विश्वासघात त्यांनी केल्याने ते सत्तेतून पायऊतार झाले. हे मंडळ बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देतानाही पैसे घेत आहे. पैशाशिवाय या मंडळाला काहीच दिसत नसल्याचे सभासदांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळेच आम्हाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत आहे.
ठेवीवर घाला
सभासदांच्या ठेवीतून सात हजार रूपये काढण्यात आले. त्याबाबत सभासदांना अंधारात ठेवले. त्याच्या पावत्या अनेकांना अद्याप मिळालेल्या नाहीत. कोरोना काळात अनेकांना गंभीर आजारांना सामोरे जावे लागले, मात्र त्या काळातही त्यांनी मानवतेच्या दृष्टीने विचार केला नाही. दोन महिला सभासदांच्या खात्यावरील रकमा यांनी परस्पर काढल्या. कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या ठेवीतील रक्कम कर्जखाती परस्पर वर्ग केली. गुरूमाऊली हे मंडळ केवळ आणि केवळ नात्यागोत्यांसाठीच निर्माण झाले होते. नाते जपताना नियमांचे उल्लंघन केले. बडतर्फ, निलंबितांना नियम डावलून परत घेतले. एवढेच नव्हे तर घेताना मुळ पदावर घेण्यात येत असताना यांनी संबंधितांना पदोन्नती देण्याचा विक्रम केला. राहुरी शाखेतील प्रकरण पाहिल्यास चोर्या कशा कराव्यात, हे गुरूमाऊलीकडून शिकावे. आरटीजीएस किंवा अन्य यंत्रणेद्वारे पैसे वर्ग करता येत असतानाही एका कर्मचार्याच्या डब्यात रोख रक्कम राहुरी शाखेकडे पाठविण्याचा घाट घातला. तो कर्मचारी एसटीत असताना त्या डब्यातील अर्धी रक्कम चोरीस गेली आणि अर्धी शाबूत राहिली. अर्धीच रक्कम चोरून नेणारा असा कोणता चोर आहे? या रकमेचा विमा वसूल केला. तेवढ्यावरच थांबले नाहीत तर संबंधित कर्मचार्याच्या पगारातूनही ही रक्कम वसूल केली.
COMMENTS