सामाजिक न्याय विभागाचा वर्धापनदिन उत्साहात पारनेर । नगर सह्याद्री महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबास...
सामाजिक न्याय विभागाचा वर्धापनदिन उत्साहात
पारनेर । नगर सह्याद्री
महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षामुळे मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली झाली. आज विविध क्षेत्रामध्ये मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द केले असून सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून या महापुरूषांनी केलेल्या संघर्षाचेच हे यश असल्याचे पारनेर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत पारनेर शहरात कार्यरत असलेल्या शासकिय मुलींच्या वसतीगृहामध्ये सामाजिक न्याय विभागाचा 90 वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षपदावरून भालेकर या बोलत होत्या. यावेळी पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, मीरा पुजारी, न्यू इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका नरसाळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा राजश्री कोठावळे, अधिक्षीका करूणा ढवळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना भालेकर म्हणाल्या, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थीनींसाठी मोफत वसतीगृह उपलब्ध करून दिले आहे. त्याचा फायदा घेऊन मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे. आपले ध्येय निश्चित करून आपले करीअर घडवावे. समाजसुधारकांचा वारसा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्राची ओळख पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र अशी आहे. पुरोगामी विचारांच्या वारशामुळेच समाजातील उपेक्षित घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. शिक्षण हे समाज परीवर्तनाचे प्रभावी साधन आहे. शिक्षणामुळेच जीवनातील आपल्या कर्तव्याची जाणीव होते. प्रत्येकाने सखोल शिक्षण घेऊन आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविण्याचे आवाहन भालेकर यांनी यावेळी केले.
प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, महापुरूषांमुळे आपला महाराष्ट्र विविध क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी क्रांती झाली आहे. शिक्षणाच्या विविध विभागांमध्ये ग्रामीण विद्यार्थीही आपले वेगळेपण सिध्द करीत असून ग्रामीण भागात निर्माण झालेल्या शैक्षणिक सुविधांचा प्रत्येकाने लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अधिक्षीका करूणा ढवळे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देऊन वस्तीगृहाविषयी उपस्थितांना अवगत केले.
COMMENTS