नगरचा आशीर्वाद बंगला पुन्हा गजबजू लागला ! अहमदनगर | नगर सह्याद्री ज्येष्ठे नेते पद्मभूषण स्व. खासदार बाळासाहेब विखे पाटील हे हयात असताना त...
नगरचा आशीर्वाद बंगला पुन्हा गजबजू लागला !
अहमदनगर | नगर सह्याद्री
ज्येष्ठे नेते पद्मभूषण स्व. खासदार बाळासाहेब विखे पाटील हे हयात असताना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत नगर शहरातील गुलमोहर रस्त्यावर असणार्या ‘आशीर्वाद’ बंगल्यात मोठी राजकीय खलबते व्हायची! दिल्लीश्वरांना धडकी बसणार्या बैठका देखील याच बंगल्यात झाल्या. बाळासाहेब विखे पाटील आजारी पडल्यानंतर आणि पुढे ते लोणीतच मुक्कामी थांबू लागल्यानंतर या बंगल्याकडे त्यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली होती. मात्र, सुजय विखे पाटील यांनी या बंगल्याचे नुतनीकरण केले आणि ते आता याच बंगल्यातून कामकाज पाहू लागले आहेत. जिल्ह्यातून येणार्या कार्यकर्त्यांना ते येथे भेटत असून त्यांची कामे येथे बसूनच मार्गी लावत आहेत. या बंगल्यातील वर्दळ वाढत चालली असून जुने कार्यकर्ते आता येथे येताना जुन्या आठवणीत रमत असल्याचे दिसते.
बाळासाहेब विखे पाटील यांना नगरमध्ये भेटण्यासाठीचे गुलमोहोर रस्त्यावरील हा बंगला सर्वांना परिचीत राहिला. आजोबांनी त्यांची राजकारणातील उभी हयात या बंगल्यातून घालवली. जिल्हा आणि राज्यातील निर्णायक बैठका याच बंगल्यावर झाल्या! या बंगल्याशी जिल्ह्यातील विखे समर्थक कार्यकर्त्यांचा असणारा स्नेह आणि जोडले गेलेले भावनिक नाते विखे पाटलांचे नातू खासदार सुजय विखे पाटील यांनी हेरले.
खासदार झाल्यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी त्यांचे नगरमधील संपर्क कार्यालय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारात सुरु केले. मात्र, हे कार्यालय जिल्ह्यातून येणार्या कार्यकर्त्यांना सर्वच दृष्टीने अडचणीचे वाटत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या आजोबांनी ज्या आशीर्वाद बंगल्यातून राजकीय बैठका केल्या, त्याच बंगल्यातून कामकाज करण्याचा निर्णय घेतला. बंगल्यातील अंतर्गत सजावट त्यांनी बदलवली. फर्निचर आणि कार्यालयीस व्यवस्थेसह येणार्या कार्यकर्त्यांना भेटण्यासाठीचे सुसज्ज असे कार्यालय त्यांनी थाटले आहे.
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नगरमधील या कार्यालयात आता सर्वाधिक राबता आहे तो नगर शहरातील कार्यकर्त्यांचा! शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या बैठका आणि भेटीगाठी घेतानाच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येणार्या कार्यकर्त्याचे प्रश्न सोडविण्यासाठीची स्वतंत्र यंत्रणाच येथे कार्यरत ठेवण्यात आली आहे. या कार्यालयातील कामकाजाची पद्धत चांगल्या कार्पोरेट कार्यालयाला लाजवील अशी असून कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेत त्यांचा लागलीच निपटारा कसा होईल याकडे स्वत: खासदार सुजय विखे पाटील हे लक्ष देवून असतात.
COMMENTS