अप्पर तहसीदार दर्जाचा अधिकारी नियुक्त होणार अहमदनगर | नगर सह्याद्री लोकसंख्या वाढली, प्रश्नही वाढले आणि कामकाजही! तरीही स्वातंत्र्यापासून ते...
अप्पर तहसीदार दर्जाचा अधिकारी नियुक्त होणार
अहमदनगर | नगर सह्याद्री
लोकसंख्या वाढली, प्रश्नही वाढले आणि कामकाजही! तरीही स्वातंत्र्यापासून ते आजतागयत नगर शहर आणि नगर तालुका या दोन्हींसाठी एकच तहसीलदार! नागरिकांची होणारी पिळवणूक आणि प्रशासनावर येणार कामाचा अतिरिक्त ताण याची माहिती समोर येताच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहरासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकार्यांनी हा प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो मंजुरीसाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यांमार्फत राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे.
राज्यात विस्ताराने सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असणार्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर अनेकदा चर्चाही झडल्या आणि निवडणुकांमधील आश्वासनांचा हा विषय देखील राहिला. मात्र, विभाजनाचा हा विषय कागदोपत्रीच राहिला. जिल्ह्याचे मुख्यालय असणार्या नगर शहरात अनेक समस्या असताना याकडे राज्य पातळीवर नेतृत्व करणार्या कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींनी लक्ष घातले नसल्याचा आरोप होत राहिला.
खासदार सुजय विखे पाटील यांनी शहराच्या विषयांमध्ये जाणिवपूर्वक लक्ष घातले. त्यातूनच त्यांनी पुढाकार घेतला आणि उड्डाणपुलाचा प्रश्न निकाली निघाला. महिनाभराच्या आत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण देखील होऊ शकते. शहराच्या वैभवात भर घालणारे हे मोठे काम विखे पाटील यांच्या माध्यमातून मार्गी लागले.
दरम्यान, नगर शहर आणि नगर तालुका या दोन्हींसाठी एकच तहसीलदार आजपर्यंत राहिला. नगर शहरात महापालिका झाली तरी नगर शहरासाठी स्वतंत्र तहसीलदार आणि कार्यालय असावे असे कोणत्याही लोकप्रतिनिधीला वाटले नाही. खा. विखे यांनी या अत्यंत ज्वलंत विषयाला हात घातला असून यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना दिलेत. या नव्या प्रस्तावानुसार नगर शहरासाठी अप्पर तहसीलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. यासाठी स्वतंत्र कार्यालय आणि स्वतंत्र कर्मचारी देखील नियुक्त केले जाणार आहेत. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती असून तो लवकरच राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. प्रशासकीय दृष्ट्या नगरकरांना ही महत्वाची भेट खासदार विखे पाटील यांनी दिल्याने व हा विषय हाती घेतल्याने नगरकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
आ. जगताप यांनीही केला होता पाठपुरावा
नगर शहर आणि नगर तालुक्यासाठी एकच तहसिल कार्यालय असल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबित राहत होती. शहरातील वाढती लोकसंख्या आणि कामाचा व्याप लक्षात घेऊन एका तहलिस कार्यालयावर कामाचा ताण येत असल्याने नगर शहरासाठी स्वातंत्र तहसिल कार्यालय निर्माण करण्याचे मागणी आमदार संग्राम जगताप यांनी महसुलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. आ. जगताप यांच्या मागणीची दखल घेत शहरासाठी नव्याने तहसिल कार्यालय उभारण्यात येणार आहे.
COMMENTS