अहमदनगर | नगर सह्याद्री शहरात साकारत असलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवनपट साकारण्यात येत आहे. या जीवनपटाच्या पिलर...
अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरात साकारत असलेल्या उड्डाणपुलाच्या पिलरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवनपट साकारण्यात येत आहे. या जीवनपटाच्या पिलरवरच एका संस्थेने जाहिरात लावल्याने उड्डाणपुलाचे विद्रुपिकरण झाले आहे. या प्रकरणाची खा. डॉ. विखे पाटील यांनी गंभीर दखल घेत दिलेल्या आदेशानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहराच्या वैभवात भर घालणार्या उड्डाणपुुुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण होत असतानाच पुलाच्या सर्व पिलरवर (खांब) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारीत चित्र साकारली जात आहेत. हे काम देखील आता बर्यापैकी गती घेत असतानाच एका खासगी शिक्षण संस्थेने त्यांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाची माहिती देणारी पोस्टर रंगकाम झालेल्या पिलरवर चिकटवली. विनापरवानगी लावलेले हे पोस्टर काढण्याचे आदेश आल्यानंतर बांधकाम विभागाकडून ती काढली. मात्र, त्यामुळे रंगकामाचे विद्रुपीकरण झाले. याची माहिती मिळताच खासदार डॉ. सुजय विखे पाटील संतप्त झाले आणि त्यांनी संबंधित संस्थेच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. खासदारांच्या आदेशानंतर संबंधित संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, नगर शहरात उड्डाणपुलाचे काम सध्या प्रगतीपथावर असून या कामावर आणि त्याच्या गुणवत्तेवर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह आमदार संग्राम जगताप लक्ष ठेवून आहेत. या कामाच्या दैनंदिन प्रगतीचा आढावा स्वत: विखे पाटील घेत असतात. दिल्लीत असले तरी ते रोज यंत्रणेच्या संपर्कात असतात. उडाणपुलाच्या पिलरवर (खांबांवर) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक देखावा सादर करणारी अतिशय रेखीव भित्तीचित्रे रेखाटली जात आहेत. पुलाखालून प्रवास करताना महाराजांचा पराक्रम आणि त्यांनी केलेली कामगीरी यानिमित्ताने दिसणार आहे.
पुलाच्या याच खांबांवर अतिशय रेखीव अशी चित्रे साकारत असताना त्यावर शहरातील एका खासगी शिक्षण संस्थेने (पॅरामेडीकल अभ्यासक्रम) काही पोस्टर चिटकवली. यासाठीची कोणतीही परवानगी या संस्थेने घेतली नाही. या पोस्टरमुळे ऐतिहासिक चित्रांचे विद्रुपीकरण झाल्याचे लक्षात येताच ती काढण्यात आली. मात्र, असे करताना या चित्रांचे रंगकाम देखील निघाले. त्यामुळे विद्रुपिकरण झाले.
ही माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना समजताच त्यांनी गंभीर दखल घेतली. नगरच्या वैभवात भर घालणारे काम होत असताना त्याचे असे विद्रुपिकरण होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असे स्पष्ट करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश विखे पाटील यांनी दिले. त्यांच्या आदेशानंतर येथील सिद्धी इन्स्टिट्यूट ऑफ पॅरा मेडिकल या संस्थेवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल विठ्ठल यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. त्यामुळे यापुढे सदर कामावर कोणीही असे विद्रुपिकरण करण्याचे धाडस दाखवणार नसल्याची चर्चा नगरकरांमध्ये झडत आहे.
COMMENTS