पारनेर येथे पदवीधर नोंदणी आढावा बैठक पारनेर येथे पदवीधर नोंदणी आढावा बैठक पारनेर | नगर सह्याद्री आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत को...
पारनेर येथे पदवीधर नोंदणी आढावा बैठक
आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीत कोणीही, कुठलाही उमेदवार असो. वादळ, बिदळ इथं चालत नाही. संगमनेरच्या बरोबरीने आम्ही पारनेर मतदारसंघातून लिड देऊ. पारनेर-नगर मतदासंघात फक्त डॉ. सुधीर तांबे यांचेच वादळ असणार आहे. मोठ्यांना खेटणे हा आमचा छंदच असल्याचे सांगत आ. नीलेश लंके यांनी भाजपाला अप्रत्यक्ष टोला लगावला.
पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत आ. नीलेश लंके यांच्या संपर्क कार्यालयात मतदार नोंदणी आढावा बैठक पार पडली. त्यावेळी आ. लंके हे बोलत होते. यावेळी मतदार नोंदणीस स्वतः लंके यांनी अर्ज भरून प्रारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, राष्ट्रवादी युवक काँग्रसचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पुनम मुंंगसे, रा. या. औटी, डॉ. बाळासाहेब कावरे, अजय फटांगरे, हिमानी नगरे, योगेश मते, सचिन औटी, सुभाष शिंदे, बाळासाहेब नगरे, वैभव गायकवाड, विजय डोळ, श्रीकांत चौरे, डॉ. सादीक राजे, रमीज राजे, अमोल गट, मिलिंद औटी, दत्तात्रय अभंग, मल्हारी शिंदे, अक्षय ठोंबरे, बाळासाहेब ढोले, दिनेश पावडे यांच्यासह मोठया संख्येने पदवीधर यावेळी उपस्थित होते.
आ. लंके म्हणाले, आ. तांबे यांच्यासारखा संपर्क ठेवणारा पदवीधर मतदारसंघातील आमदार मी पाहिला नाही. 15 वर्षांपूर्वी जे आमदार असायचे त्यांचे नाव मतदार नोंदणी व मतदानाच्या वेळीच ऐकायला मिळायचे. निकालानंतर ते पहायलाही मिळत नसत. आ. तांबे हे मात्र प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होतात. अधिवेशनाच्या काळातही इतर आमदारांपेक्षा त्यांची भुमिका नेहमी उजवी असल्याचे अनुभवण्यास मिळते. शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडतात.
आ. लंके पुढे म्हणाले, आता आपल्याला मोठ्यांशी स्पर्धा करायची आहे. त्यामुळे पदवीधरच्या निवडणूकीत संगमनेरपेक्षा जास्त लिड देण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. डॉ. तांबे नव्हे तर आम्ही उमेदवार आहोत हे समजून नोंदणी करून घेऊ तसेच मतदानही घडवून आणू. माझ्या आमदारकीमध्ये आ. तांबे यांचा सिंहाचा वाटा आहे. आता आमची जबाबदारी आहे. तुम्ही केलेल्या मदतीतून उतराई होण्याची ही संधी आहे. मागील निवडणूकीत मी वेगळया पक्षात होतो. मतदार नसलो तरी मदत मात्र तुम्हालाच केली होती. तुमचाच झेंडा फडकविला होता याची आठवणही लंके यांनी करून दिली. यावेळच्या निवडणूकीत कोणीही, कुठलाही उमेदवार असो. वादळ बिदळ इथं चालत नाही. इथे फक्त डॉ. सुधीर तांबे यांचेच वादळ असणार आहे.
डॉ. तांबे यांच्या अंगावर गुलाल नक्की!
दोन वर्षांपूूर्वी मी पदवीधर झालोय, मी लकी मतदार आहे. त्यामुळेच पहिली मतदार नोंदणी मी केली आहे. आजवर मी ज्याला मतदान केले त्याच्या अंगावर गुलाल पडलेला आहे. त्यामुळे डॉ. तांबे यांच्या अंगावर या निवडणूकीत नक्की गुलाल पडले असा विश्वास आ. लंके यांनी व्यक्त केला.
तरूण आमदारांसाठी आ. लंके प्रेरणादायी ः डॉ. सुधीर तांबे
राज्यात जे तरूण आमदार आहेत, त्यात आ. लंके यांचे नाव अग्रभागी आहे. कामाचा वेग, सामान्य माणसाविषयी असलेली तळमळ, कोव्हीड काळात त्यांनी केलेल्या कामाची देशभराने घेतलेली प्रेरणा हे पाहता तरूण आमदारांसाठी आ. लंके यांचे काम प्रेरणादायी आहे. समाजाची नाडी ओळखायची असेल तर समाजाशी एकरूप झाले पाहिजे. ते काम आ. लंके यांच्याकडून करण्यात येत असल्याचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. राज्याच्या राजकारणात काय चाललंच ते तुम्ही पाहताय. उलटया दिशेने फिरणार्या चाकांना सोयीच्या दिशेने आता फिरवायचे आहे. सामान्य माणसाच्या हिताचे राजकारण राज्यात उभे करायचे असल्याचे डॉ. तांबे यांनी सांगितले.
COMMENTS