अहमदनगर / नगर सह्याद्री - आज वसुबारस. दिवाळसणाचा प्रारंभ करणारा दिवस. हा भारतीय कृषक संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी गृहिणीं...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
आज वसुबारस. दिवाळसणाचा प्रारंभ करणारा दिवस. हा भारतीय कृषक संस्कृतीतील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी गृहिणींकडून सूर्यास्तानंतर सवत्स म्हणजे वासरासोबत असलेल्या गाईचे पूजन केले जाते. ग्रामीण भागात गवताच्या पेंढीत छोटी पणती लावून गोधनाला ओवाळण्याची प्रथा आहे.
बहुतांश गोशाळांत सेवाभावी वृत्तीने सांभाळल्या जाणाऱ्या बऱ्याच गायी अनुत्पादक आहेत. मात्र, त्यांच्या शेताचे खत, गोबर गॅस, पंचगव्य, दूध, तुपापासून मिठाईसह औषधीपर्यंत वापर केला जातो.
यात डांगी, देवणी, गीर, खिल्लारी, थारपरकर, कांकरेज, साहिवाल, लाल कंधारी व अमृतमहल अशा जाती आहेत. पैकी डांगी, देवणी, खिल्लारी व लाल कंधारी या राज्यातील ४ जाती आहेत.
महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्थांमार्फत चालणाऱ्या ८४ गोशाळांमध्ये १३,०३० गायींचा सांभाळ केला जातो. राज्यात शेतकरी आणि गोशाळा असे मिळून १ कोटी ३९ लाख गायींचा सांभाळ केला जातो. देशात ही संख्या १९ कोटी ३४ लाख इतकी आहे.
स्वरूप
या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पाढती आहे.
COMMENTS