अहमदनगर | नगर सह्याद्री यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ ज. बोठे याला फरार असतान...
अहमदनगर | नगर सह्याद्री
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ ज. बोठे याला फरार असतानाच्या काळात हैदराबाद येथे मदत करणारा जनार्दन अकुला चंद्रप्पा (रा. रामनगर, हैदराबाद) याच्या नावाने न्यायालयाने पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. चंद्रप्पा व त्याचे वकील या खून प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीस सतत गैरहजर राहत असल्याने या प्रकरणात सरकार पक्षाला सहकार्य करणारे जरे कुटुंबियांचे वकील अॅड. सचिन पटेकर यांनी चंद्रप्पाविरुद्ध वॉरंट जारी करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने ती मान्य करून चंद्रप्पा याच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सुनावणी आता ३ नोव्हेंबरला होणार आहे.
रेखा जरे खून खटल्यातील सर्व १२ आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीची प्रक्रिया प्रलंबित आहे. तसेच आरोपी शेख इस्माईल शेख अली, राजशेखर अजय चाकाली व अब्दुल रहेमान अब्दुल अरिफ या तिघांनी जरे खून खटल्याशी संबंध नसल्याचा दावा करत या खटल्यातून वगळण्याची मागणीही केली आहे. पण या खटल्याच्या सुनावणीस या आरोपींपैकी कोणीही वा त्यांचे वकीलही हजर राहत नसल्याने आरोप निश्चितीची प्रक्रिया लांबणीवर पडत चालली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीस केवळ नगरमधील आरोपी महेश तनपुरे उपस्थित होता. त्यामुळे न्यायालयाने चंद्रप्पाविरुद्ध पकड वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले. तसेच ज्या तीन आरोपींनी खटल्यातून वगळण्याची मागणी केली, त्यांना युक्तिवादासाठी शेवटची संधी म्हणून ३ नोव्हेंबरला सुनावणी निश्चित केली आहे. या दिवशी या तिघांनी त्यांना या खटल्यातून का वगळावे, याबाबत युक्तिवाद केला नाही तर त्यांचा अर्ज फेटाळण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला फरार असतानाच्या काळात आम्ही काहीच मदत केली नाही व त्याचा-आमचा काहीही संबंध नाही, त्यामुळे त्याला मदत केल्याच्या गुन्ह्यातून आम्हाला वगळावे, अशी मागणी शेख इस्माईल, राजशेखर चकाली व अब्दुल रहेमान या तीन आरोपींची आहे. पण, हे तीन आरोपी व त्यांचे वकीलही सुनावणीस गैरहजर राहत असल्याने त्यांच्या मागणीवर सरकार पक्षाचा युक्तिवाद झाला नाही. न्यायालयाने शेवटची संधी म्हणून ३ नोव्हेंबरला सुनावणी ठेवली आहे. या दिवशी आरोपी हजर राहिले नाही तर या प्रकरणातील आरोपींवर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू होईल, असे अॅड. पटेकर यांनी सांगितले.
COMMENTS