विरोधकांकडून लक्ष होत असल्याने राजीनामा दिल्याची चर्चा पारनेर / नगर सह्याद्री - पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी गुरुवा...
विरोधकांकडून लक्ष होत असल्याने राजीनामा दिल्याची चर्चा
पारनेर / नगर सह्याद्री -
पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी गुरुवारी आपल्या नगराध्यक्ष पदाचा आणि नगरपंचायतीतील गटनेतेपदाचा राजीनामा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांकडे लेखी पत्राद्वारे सोपवला आहे. औटी यांनी राजीनामा दिल्यामुळे पारनेर शहरात खळबळ उडाली असून विरोधकांच्या राजकीय कुरघोड्यांमुळे राजीनामा दिल्याची दबया आवाजात चर्चा आहे.
गेल्या सहा महिन्यात शासकीय कामात अडथळासह जमीन खरेदीतून फसवणुकीचे पारनेर पोलिस ठाण्यात नगराध्यक्ष विजय औटी यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दुसरीकडे इतर माध्यमातूनही त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचे काम स्थानिक पातळीवर विरोधकांकडून चालू असून विरोधकांच्या या कुरघोडीच्या राजकारणाला व जाचाला कंटाळून राजीनामा दिल्याचे दैनिक नगर सह्याद्रीशी बोलताना त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.
पत्रात औटी यांनी म्हटले आहे, की जेव्हापासून मी पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कारभार हातात घेतला तेव्हापासून माझी व माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्यासाठी कट कारस्थाने रचू लागली. राजकीय वैमनस्यातून मला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू झाले. अनेक जुनी प्रकरणे काढून माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न विरोधकांनी केले असून या खोट्या गुन्ह्यांमुळे मी नगराध्यक्ष पदाला वेळ देऊ शकत नाही. नगराध्यक्षपदाची खुर्ची माझ्या कार्यात अडथळा ठरत असेल तर अशा खुर्चीवर मी तुळशीपत्र ठेवून आमदार नीलेश लंके यांचा एक कार्यकर्ता म्हणून व राष्ट्रवादी पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करणार आहे.
आ. लंके यांनी बहुमत नसतानाही अपक्ष व भाजप नगरसेवकांचा पाठिंबा घेऊन मला नगराध्यक्षपदी विराजमान केले. एका एसटी कर्मचार्याला मुलाला नगराध्यक्षपद देऊन माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आमदार लंके यांनी जो सन्मान केला आहे, तो कधीच विसरू शकत नाही. नगराध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पारनेरच्या पाणी प्रश्नावर ३७ तांत्रिक बाबीचा अडथळा असतानाही आमदार लंके यांच्या माध्यमातून त्यासाठी विशेष प्रयत्न चालू केले होते. परंतु प्रस्थापित राजकारण्यांनी मला व माझ्या कुटुंबीयांना लक्ष करून वेळोवेळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. आ. लंके यांनी पारनेरचा चेहरा बदलण्यासाठी आमच्या पदाधिकार्यांच्या माध्यमातून जणू विडाच उचलला होता. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दि. २० ऑटोबर रोजी विकास आराखडा मंजूर करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नगराध्यक्षपद हे जनतेची सेवा करण्याची एक साधन आहे. परंतु ते कधी माझं साध्य होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे आ. लंके २४ तास ३६५ दिवस जनतेची सेवा करत असतात त्याचप्रमाणे मी काम करणारा एक सच्चा कार्यकर्ता आहे. माझ्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात अधिकार्यांनी, पदाधिकार्यांनी व सर्व नगरसेवकांनी मला जी मोलाची साथ दिली ती महत्त्वाची व अनमोल आहे. माझ्या संकट काळात ज्या नगरसेवकांनी, माता माऊलींनी व मतदारांनी साथ दिली त्याच्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे व भविष्यातही ऋणी राहील, असे भावनिक पत्र नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्यांना दिले आहे.
अखेरच्या श्वासापर्यंत पारनेरच्या पाणी प्रश्नासाठी लढणार
कोणत्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी आमच्या कुटुंबाला नसतानाही आ. लंके यांनी नगरसेवकांच्या मदतीने पारनेर नगराध्यक्षपदाची माळ माझ्या गळ्यात घातली. त्यामुळे नगराध्यक्षपदाचा जरी मी राजीनामा दिला असला तरी शेवटच्या श्वासापर्यंत पारनेरच्या पाण्याचा प्राणी प्रश्न तडीस नेण्यासाठी आ. लंके यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढील काळात काम करणार आहे. पारनेरच्या जनतेची सेवा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक नगरसेवक म्हणून यापुढे काम करणार असून राजकीय कुरघोडीचा व विरोधकांच्या कुटनीतिचा मी बळी ठरलो असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्ष विजय औटी यांनी दैनिक नगर सह्याद्रीला बोलताना व्यक्त केली.
COMMENTS