मुंबई / नगर सह्याद्री - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली...
मुंबई / नगर सह्याद्री -
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी, निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी सज्ज व्हा आणि कामाल लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहेत.
राज ठाकरे म्हणाले की, "मी तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणार आहे. स्वत: सत्तेच्या खुर्चीवर उडी मारून बसणार नाही. आपल्यापैकी एक सत्तेत असेल. आत्ताच्या राजकारणाला लोक कंटाळली आहे. त्यामुळे मनसेकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे आपले विचार सकारात्मक ठेवा. लोकांपर्यंत पोहचा" असं त्यांनी सांगितले.
"बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यानंतर त्यांना फक्त यशच मिळालं नाही. त्यांना पराभवही पाहावा लागला. पण पराभवामुळे ते कधी रडले नव्हते. आम्हीदेखील विजय, पराभव पाहिला. पण आम्ही रडलो नाही, तर लढलो. येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला सर्वात मोठं यश मिळेल" असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला.
दरम्यान, "दसरा मेळाव्यात केवळ चिखलफेक होत होती. याठिकाणी कुठलेही विचार मांडले गेले नाहीत. त्यामुळे मनसेचे जे विचार मराठी माणूस, हिंदुत्वासाठी आहेत ते लोकांपर्यंत पोहचवावा. ग्राऊंड पातळीवर लोक पर्याय शोधत आहेत. सहानुभूती मिळत नाही. त्यामुळे सकारात्मक विचार लोकांपर्यंत घेऊन जावेत" असंही राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले.
COMMENTS