बीड / नगर सह्याद्री - भगीरथ बियाणी हे भाजपचे बीड शहराध्यक्ष होते. त्यांनी सकाळी आत्महत्या केली. गोळी झाडून घेत त्यांनी स्वतःला संपवले. मात्...
बीड / नगर सह्याद्री -
भगीरथ बियाणी हे भाजपचे बीड शहराध्यक्ष होते. त्यांनी सकाळी आत्महत्या केली. गोळी झाडून घेत त्यांनी स्वतःला संपवले. मात्र, या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना शहरातील फिनिक्स रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
बियाणी यांच्या आत्महत्येची बातमी समजताच खासदार प्रीतम मुंडे यांनी तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यांच्यासोबत कार्यकर्तेही रुग्णालयात पोहचले. या अचानक घडलेल्या घटनेने साऱ्यांनाच मोठा धक्का बसला. त्यांनी आत्महत्या का केली, याची चर्चा सुरू आहे. या मागे कौटुंबिक कारण की राजकीय अशी चर्चाही रंगली आहे.
खासदार प्रीतम मुंडे रुग्णालयातून बाहेर पडल्या. तेव्हा त्यांना जमलेल्या कार्यकर्त्यांनी गराडा घातला. यावेळी कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले, तर खासदार प्रीतम मुंडे यांचेही डोळे पाणवले. या अनपेक्षित घटनेचा धक्का मोठा होता. त्यामुळे रुग्णालयात परिसरात जमलेले अनेक कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी तिथेच हंबरडा फोडला.
सध्या बियाणी यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. या ठिकाणी नातेवाईकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्यने गर्दी केली आहे. पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपअधीक्षक संतोष वाळके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांनी धाव घेतली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
भगीरथ बियाणी यांनी सकाळी आत्महत्या केली. त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे समजताच अनेकांना धक्का बसला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली. बियाणी यांचे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतचे फोटो आणि विविध कार्यक्रमामधील फोटो फेसबुक, ट्विटर आणि सोशल मीडियावर शेअर केले. व्हॉटस्अप ग्रुपवरही बियाणी यांचे फोटो शेअर करण्यात आले.
COMMENTS