अहमदनगर / नगर सह्याद्री - शिक्षक बँकेमध्ये गेली सहा वर्षे संचालक म्हणून काम करताना माझ्यासहित सर्व संचालकांनी सभासद हिताचेच निर्णय घेतले. सभ...
अहमदनगर / नगर सह्याद्री -
शिक्षक बँकेमध्ये गेली सहा वर्षे संचालक म्हणून काम करताना माझ्यासहित सर्व संचालकांनी सभासद हिताचेच निर्णय घेतले. सभासदांचा नेहमी फायदा कसा होईल हा दृष्टिकोन समोर ठेवून कामकाज केले. त्यामुळेच या सहा वर्षांमध्ये कायम ठेवीचे व्याज,लाभांश आणि कर्जावरील व्याज दरातील कपात या रूपाने जेवढा लाभ सभासदांना आम्ही दिला, तेवढा मागील ४० वर्षात कोणत्याही संचालक मंडळाने दिलेला नाही. सभासद हिताच्या अनेक योजना आम्ही सुरू केल्या. सभासदांचा विश्वास आम्ही कमावलेला आहे. त्यामुळे या निवडणुकीत देखील बापूसाहेब तांबे, राजकुमार साळवे, दिनेश खोसे, बाळासाहेब कदम,एल पी नरसाळे आदींच्या नेतृत्वाखालील गुरुमाऊली आघाडीचा विजय हमखास होणार आहे. कर नाही त्याला डर नाही या न्यायाने आम्ही काम केले आहे. त्यामुळे निकालही आमच्याच बाजूने लागेल असे ठाम प्रतिपादन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन, बँक शताब्दी समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण यांनी केले.
सुरुवातीची साडेतीन वर्षे रोहकले गुरुजींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केले. त्यांना पूर्ण साथ दिली. ते निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सन्मानाने आपला उत्तराधिकारी निवडणे अपेक्षित होते. परंतु ऐन निवृत्तीच्या वेळी त्यांना पदाची लालसा निर्माण झाली आणि त्यांनी निवृत्तीनंतरही चेअरमन कसे राहता येईल असे प्रयत्न सुरू केले. कायद्यानुसार ते निवृत्त झाले. नवीन चेअरमन निवड करताना गुरुमाऊलीमध्ये दोन गट झाले. गुरुजींनी सर्व संचालकांना त्यावेळी विश्वासात घेतले असते तर पुढच्या घडामोडी घडल्या नसत्या. परंतु पुढील चेअरमन कोण याबाबत ते कोणतीही चर्चा करीत नव्हते. बँकेच्या पायऱ्या चढताना मला जे नाव सुचेल ते मी सांगेन अशी विधाने त्यांनी त्यावेळीही केली. काल ही त्यांनी बँकेला फार हुशार संचालकांची गरज नाही. तिथे फार डोकं लावावं लागत नाही अशी बालिश विधाने करून माझ्याशिवाय बँक कोणी चालवूच शकत नाही असा गोड गैरसमज करून घेतल्यामुळे पुढे दोन गट पडले.साडेतीन वर्षे मी त्यांचा पाठीराखाच होतो. परंतु ९ जुलै रोजी २०१९ रोजी झालेल्या चेअरमन निवडीच्या आदल्या दिवशी त्यांनी ज्या पद्धतीने राजकीय शक्तींचा वापर करून संचालकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला ते मला भावले नाही. त्यामुळे मी त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.
बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली साहेबराव अनाप चेअरमन झाल्यानंतर आजपर्यंत बँकेने खूप प्रगती केली आहे. ठेवींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कर्जाचा व्याजदर कमी झाला आहे. कायम ठेवीवर पावणे आठ, आठ आणि सव्वा आठ अशा सर्वोच्च दराने व्याज आम्ही देऊ शकलो.गृह कर्ज, वाहन तारण कर्ज, शैक्षणिक कर्ज असे नवीन कर्जे सुरू केली. जिल्ह्यातील कोणत्याही शाखेत कोणत्याही सभासदाला कसलीही अडचण येणार नाही. सुलभ रीतीने त्यांना कर्ज पुरवठा कसा होईल याबाबत सर्व संचालक जागरूक राहिले याचे मला समाधान आहे.
कोरोना काळात मी चेअरमन झालो. त्याबाबत काही मित्रांनी हेटाळणी सुद्धा केली. परंतु कोरोनाच्या काळामध्ये देखील आम्ही सभासदांना कोविड कर्ज दिले. बँकेतर्फे पाच लाख रुपयांची मदत देण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी वार्षिक सभेच्या मान्यतेने मयत निधी मुदत ठेवीतून प्रत्येकी सात हजार रुपये मदत कर्ज निवारण निधीत घेऊन सर्व लाभार्थी सभासदांना लाभ दिले.हे करताना एकाही सभासदाचे आर्थिक नुकसान केले नाही. विरोधक याबाबत अत्यंत खोटे आरोप करतात ही दुर्दैवी बाब आहे. कुटुंब आधार निधीच्या माध्यमातून ज्या कुटुंबांना मदत मिळाली त्याबद्दल त्यांच्या भावना शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. कुटुंब आधार निधी हा दीडशे रुपयेच आहे. परंतु कोरोना काळात मोठ्या संख्येने सभासद दिवंगत झाल्याने सर्वांना लवकर मदत पोहोचावी म्हणून तो काही कालावधीसाठी पाचशे रुपये करण्यात आलेला आहे, तो ही वार्षिक सभेच्या मान्यतेने केला आहे. पुढील चार-पाच महिन्यांमध्ये सर्व लाभार्थींना लाभ मिळाल्यानंतर ती रक्कम पूर्ववत दीडशे रुपये होणार आहे. या संदर्भात त्यावेळी विरोधकांशी देखील आम्ही चर्चा केली होती. मात्र केवळ राजकारण डोळ्यासमोर ठेवून आज ही मंडळी सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत. परंतु या निमित्ताने एक चांगले झाले कि सभासदांना या योजनेचा अभ्यास करता आला असे सर्व सभासद म्हणतात. अडचणीच्या काळात मदत करण्यासाठी मदत झाली हे आमचे भाग्य आहे.
यापूर्वी बँकेत सत्ता भोगलेले सदिच्छा मंडळ, गुरुकुल मंडळ यांची नेतेमंडळी आज बेलगाम आरोप करीत आहेत. परंतु त्यांच्या काळामध्ये झालेला महाभ्रष्टाचार जर आपण डोळ्यासमोर ठेवला तर ही मंडळी किती खोटे बोलतात याची प्रचिती येते. बँकेचा सर्व नफा थेट सभासदापर्यंत पोहोचविल्यामुळे सभासदांना जास्तीत जास्त व्याज देता आले. कर्जावरील व्याजदर कमी करता आला. भविष्यात देखील कर्जावरील व्याजदर सात टक्केच करणार आहोत. बापूसाहेब तांबे यांची दूरदृष्टी ही बँकेच्या प्रगतीसाठी मोठी जमेची बाजू आहे.पदाधिकारी निवडीमध्ये त्यांनी सर्वांना संधी दिली. माझ्यासारखा अल्पसंख्यांक माणूस ४० वर्षानंतर बँकेचा चेअरमन झाला. इतरही सर्व संवर्गांना पदाधिकारी होण्याचा मान मिळाला. ही किमया फक्त बापूसाहेबच करू शकतात. इतर लोक मात्र त्याचे फक्त राजकारण करतात याची देखील प्रचिती आम्हाला आली. त्यामुळे आगामी काळात आपल्या कामधेनूची प्रगती करणे या एकमेव उद्देशाने गुरुमाऊली मंडळ या निवडणुकीत उतरले आहे.
विकास मंडळासाठी प्रत्येक सभासदाचा दहा हजार रुपये निधी देण्याबाबत अनेक वेळा चर्चा झाली. परंतु विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेशी या रकमेच्या परतीचा लेखी हमी करार आजपर्यंत केला नाही. हा करार न केल्याने व न्यायालयाने देखील याबाबत संचालकांना जबाबदार ठरविल्याने त्या ठिकाणी निधी देता आला नाही. विकास मंडळाने सभासदांच्या पैशाच्या परतीची हमी घेणे गरजेचे आहे. त्या जागेवर आता गुरुजी सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे स्वप्न साकार करावयाचे आहे. या हॉस्पिटल द्वारे जिल्ह्यातील समस्त शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांच्या उपचारांना सवलतीच्या दरात सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्ह्यातील ४० लाख लोकसंख्येच्या लोकांना याचा फायदा होणार आहे आणि एक चांगली समाजसेवा जिल्ह्यातील १२ हजार गुरुजींच्या हातून घडणार आहे.
बँकेच्या निवडणुकीचे निमित्ताने गेले पंधरा दिवस प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना विरोधी मंडळांनी अत्यंत खालच्या थराला जाऊन बेलगाम बेछूट आरोप केले.निखालस खोट्या बाबी सभासदांवर बिंबविण्याचा प्रयत्न केला. परंतु सुज्ञ सभासदांनी सर्व विषयांचा अभ्यास केला आहे. चहापान खर्चाचे सदिच्छा,गुरुकूलचे आकडे आमच्यापेक्षा त्यांचे खूप आहेत. प्रवास खर्चाबद्दलही गैरसमज करून दिले आहेत. परंतु सभासद हे जाणतात कि त्यांना सर्वाधिक लाभ याच संचालक मंडळाकडून झाला आहे. विशेषतः मागील तीन वर्षांमध्ये झालेला कारभार हा बँकेच्या इतिहासातील अत्यंत चांगला असा कारभार आहे.याचे मला आणि माझ्या सर्व सहकारी संचालकांना समाधान आहे. त्यामुळे उद्या देखील बापूसाहेब तांब्यांच्या नेतृत्वाखाली बँक आणि विकास मंडळामध्ये गुरुमाऊली मंडळाचा विजय होईल आणि जिल्ह्यातील शिक्षकांसाठी विकासाचे नवे पर्व सुरू होईल असा आत्मविश्वासही श्री. सलीमखान पठाण यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS